अस्मानीनंतर सुलतानी संकट! बोगस बियाण्यांवर हजारो तक्रारी
१०० एकरावरील सोयाबीन उगवलेच नाही!
सोलापूर जिल्ह्यातील १२ शेतकऱ्यांच्या 'कृषी'कडे तक्रारी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्याचे मुख्य खरीप पीक असलेल्या सोयाबीनवर यंदा अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटे आली असून, शेतकऱ्यांकडून उगवण क्षमतेच्या शेकडो तक्रारी येऊ लागल्या आहेत.
आतापर्यंत कृषी विभागाकडे तीन हजार ६१५ तक्रारी आल्या असून, प्रयोगशाळांकडे पाठवलेले ५८१ नमुने अप्रमाणित निघाले आहेत. यामुळे 'ॲक्शन मोड'वर आलेल्या कृषी विभागाने आतापर्यंत बियाणे कंपन्यांवर चार ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.
राज्यात यंदा ४७ लाख हेक्टरहून अधिक सोयाबीनचा पेरा होण्याची अंदाज आहे. त्यापैकी १३ जुलैअखेर ३७ लाख ३६ हजार हेक्टरवर पेरा झाला आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सोयाबीन उत्पादक शेतकरी एकूण बियाण्यांपैकी ७५ टक्के घरगुती बियाणे वापरतात. तसेच २० ते २५ टक्के बियाणे बाजारपेठांमधून घेऊन वापरले जाते. राज्यात बियाण्यांची विक्री करणाऱ्या ५० पेक्षा जास्त कंपन्या आहेत. या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना सत्यप्रत बियाण्यांची विक्री केली जाते.
प्रमाणित बियाण्यांप्रमाणे सत्यप्रत बियाणे शासनाच्या काटेकोर तपासणी प्रणालीत समाविष्ट नाही. खासगी कंपनी स्वतःच्या जबाबदारीवर त्यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीन बियाण्याच्या विक्री पिशवीवर 'किमान ७० टक्के उगवण क्षमता असलेले सत्यप्रत्य बियाणे' असे लेबल लावते. खासगी कंपन्यांच्या या लेबलच्या भरवश्यावर शेतकरी बियाणे विकत घेऊन पेरा करतो.
सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यात ३५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मॉन्सूनच्या सुरवातीला बार्शी तालुक्यात थोडा पाऊस झाला होता, त्यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरले.
मात्र, १२ शेतकऱ्यांचे सुमारे १०० एकरावरील सोयाबीन उगवलेच नाही. त्यांनी आता कृषी विभागाकडे धाव घेतली असून त्याचे पंचनामे सुरू आहेत.
सोलापूर जिल्ह्यात जुलैपर्यंत १९८ मिलिमीटर सरासरी पाऊस अपेक्षित आहे, पण सध्या सरासरीच्या ५० टक्केसुद्धा पाऊस झाला नाही. मात्र, जूनमध्ये सुरवातीच्या काही नक्षत्रात पाऊस होईल, या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मका अशा पिकांची पेरणी केली. जिल्ह्यात पाऊस झालेला नसल्याने त्या पिकांनी आता माना टाकल्या आहेत. त्यातच सोयाबीनचे बियाणे बनावट निघाल्याच्या तक्रारी बार्शीतील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या आहेत. त्या १२ शेतकऱ्यांनी आम्ही पेरलेले बियाणे उगवलेच नाही, असे म्हटले आहे.
तक्रार निवारण समितीत 'महाबीज'चा प्रतिनिधी, पंचायत समितीची कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, कंपनीचा प्रतिनिधी, राहुरी कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी असतात. समितीच्या पंचनाम्यातून जमिनीतील ओलावा कमी असल्याने की बियाणेच बनावट होते, ही बाब समोर येणार आहे.
१८.५८ लाख क्विंटल खासगी बियाणे बाजारात
राज्यात 'महाबीज'सह विविध खासगी कंपन्यांनी १८ लाख ५७ लाख क्विंटल सोयाबीन बियाणे यंदा राज्याच्या बाजारपेठांमध्ये विक्रीला आणले आहे. यापैकी आतापर्यंत किती विकले गेले, यातील नेमके निकृष्ट बियाणे किती याची माहिती नसल्याने कृषी विभागदेखील संभ्रमात आहे. त्यामुळे तक्रारी असलेल्या जिल्ह्यांवर कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांनी लक्ष केंद्रित केले आहे.
सदोष बियाण्यामुळे उगवण न झाल्याच्या आतापर्यंत साडेतीन हजाराहून अधिक तक्रारी शेतकऱ्यांकडून आल्या आहेत. यात मुख्यत्वे अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ,सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. यातही पुन्हा सर्वाधिक तक्रारी बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या विरोधात दाखल झाल्या आहेत.
या कंपनीविरोधात १३ जुलैअखेर ११२९ तक्रारी आल्या असून, कृषी विभागाने अकोला व अमरावती व वर्धा अशा तीन जिल्ह्यांमध्ये कंपनीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर रवी हायब्रीड सीड्स ॲण्ड रिसर्च कंपनीविरोधात ८७० तक्रारी शेतकऱ्यांकडून आल्या आहेत. या कंपनीविरोधात देखील अकोला जिल्ह्यात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 'महाबीज', तसेच पार्श्व जेनेटिक्स कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांविरोधात तक्रारी येत असून क्षेत्रीय पातळीवर तपासणी सुरू करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील १२ शेतकऱ्यांनी त्यांनी पेरलेले सोयाबीन उगवले नाही, अशा तक्रारी केल्या आहेत. आता तक्रार निवारणी समितीच्या माध्यमातून त्याचे पंचनामे सुरू आहेत. त्या अहवालानंतर शेतकऱ्यांना ग्राहक मंचाकडे तक्रारी कराव्या लागतील.
- शुक्राचार्य भोसले, कृषी अधीक्षक, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वात कमी १० टक्केच क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याशिवाय अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, मोहोळ, माढा, सांगोला, पंढरपूर या तालुक्यात २० टक्क्यांपेक्षा कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बार्शीत सर्वाधिक ५० टक्के, करमाळा व माळशिरस तालुक्यात सरासरी ४० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात तीन लाख ३७ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी होते, पण यावर्षी १४ जुलैपर्यंत ९७ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. मात्र, पाऊस नसल्याने पेरलेल्या पिकांनी माना टाकल्या असून पुढील १५ दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते, अशी भीती कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

No comments:
Post a Comment