दुधात विष कालवणाऱ्यांवर तुकाराम मुंढेंचा 'सर्जिकल स्ट्राईक'! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 6, 2026

दुधात विष कालवणाऱ्यांवर तुकाराम मुंढेंचा 'सर्जिकल स्ट्राईक'!

 दुधात विष कालवणाऱ्यांवर तुकाराम मुंढेंचा 'सर्जिकल स्ट्राईक'!

सोलापूरसह एकाचवेळी सहा जिल्ह्यांत धडक छापेमारी
अडीच ते तीन कोटींचा मुद्देमाल जप्त, १३ जणांना अटक 
शाम्पू, केमिकल्स मिसळून 'विषारी दूध' पुरवठ्याचा पर्दाफाश



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दूध भेसळ माफियांच्या मुसक्या आवळत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यव्यापी धडक कारवाई केली. पुणे, सोलापूर, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि भिवंडी अशा सहा ठिकाणी एकाचवेळी टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल अडीच ते तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १३ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राज्यातील दूध भेसळ करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले असून, या रॅकेटमध्ये आणखी काही बडे मासे अडकण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

मंचर पोलीस ठाण्यात या प्रकरणी विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींना घोडेगाव न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासन संयुक्तपणे करत आहे.

४५ अधिकाऱ्यांचे विशेष पथक; गोपनीय नियोजनातून मोठी कारवाई

दूध भेसळीचे राज्यव्यापी जाळे कार्यरत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्याशी समन्वय साधत विशेष कारवाईची आखणी केली. स्थानिक गुन्हे शाखा आणि एफडीएच्या सुमारे ४५ अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. कोणालाही संशय येऊ न देता रविवारी पहाटे पुणे (मंचर), सोलापूर, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर (सिल्लोड) आणि भिवंडी येथे एकाचवेळी छापेमारी करण्यात आली.

या कारवाईदरम्यान मंचरमधून दोन संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण रॅकेटची पाळेमुळे उघड झाली. त्यानंतर विविध ठिकाणी धाडसत्र सुरू ठेवत पोलिसांनी एकूण १३ आरोपींना अटक केली.

मंचर बनले होते भेसळीचे मुख्य केंद्र

तपासादरम्यान उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचर हे संपूर्ण भेसळ रॅकेटचे मुख्य केंद्र असल्याचे निष्पन्न झाले. मंचरसह खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील विविध अड्ड्यांवरून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध तयार करून राज्यातील विविध भागात पुरवठा केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

शाम्पू, दूध पावडर आणि घातक केमिकल्सचा वापर

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दूध भेसळीची पद्धत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दूध उत्पादकांकडून डेअरीमध्ये येणाऱ्या शुद्ध दुधात मोठ्या प्रमाणावर पाणी, वास न येणारा शाम्पू, दूध पावडर आणि विविध घातक रासायनिक पदार्थ मिसळून बनावट दूध तयार केले जात होते.

१,००० लिटर शुद्ध दुधामध्ये तब्बल ५०० लिटरपर्यंत, तर ५०० लिटर दुधात जवळपास ३०० लिटर भेसळ केली जात होती. दुधाचा घट्टपणा आणि रंग कायम राहावा यासाठी विशेष रासायनिक मिश्रणांचा वापर केला जात असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

नामांकित कंपन्यांनाही पुरवठा

भेसळयुक्त दूध केवळ स्थानिक बाजारापुरते मर्यादित नव्हते. हे दूध राज्यातील काही नामांकित डेअरी आणि ब्रँडपर्यंत पोहोचत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. याच दुधापासून पनीर, खवा आणि इतर दुग्धजन्य पदार्थ तयार करून गेल्या दोन वर्षांपासून बाजारात विक्री होत असल्याची धक्कादायक माहितीही तपासात समोर आली आहे.

यामुळे लाखो नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर स्वरूपाचा खेळ झाल्याची शक्यता व्यक्त होत असून, या उत्पादनांचा पुरवठा नेमका कोणत्या कंपन्यांना झाला, याचा तपास आता वेगाने सुरू आहे.

अडीच ते तीन कोटींचा मुद्देमाल जप्त

या संयुक्त कारवाईदरम्यान भेसळीसाठी वापरले जाणारे रसायने, दूध पावडर, विविध साहित्य, यंत्रसामग्री, वाहने आणि इतर सामग्रीसह एकूण अडीच ते तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या साहित्याची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले आहेत.

आणखी बडे मासे जाळ्यात येण्याची शक्यता

या संपूर्ण रॅकेटमध्ये काही मोठे डेअरी चालक, पुरवठादार आणि आर्थिक साखळीतील इतर घटक सहभागी असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी नाकारलेली नाही. अटक आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

आरोग्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही – प्रशासनाचा इशारा

दुधासारख्या जीवनावश्यक अन्नपदार्थामध्ये घातक रसायने मिसळून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नसून राज्यभर अशा टोळ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

या धडक कारवाईमुळे राज्यातील दूध भेसळ व्यवसायाला मोठा हादरा बसला असून, सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या माफियांविरोधात प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages