पेपर लीक'च्या विळख्यात महाराष्ट्र! लाखों विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात; सरकारवर संतापाचा भडका
शिक्षणाचा बाजार, भवितव्याचा सौदा!
सोलापूर (सचिन जाधव):- महाराष्ट्रातील शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणारी टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द झाल्याने राज्यातील हजारो उमेदवारांचे भविष्य पुन्हा एकदा अधांतरी लटकले आहे. 'नीट' परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणानंतर आता टीईटी परीक्षेवरही पेपर लीकचे सावट आल्याने राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधी प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आला असून, त्यानंतर सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
या घटनेमुळे राज्यभरातील विद्यार्थी, पालक आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर परीक्षेच्या तयारीत असलेल्या उमेदवारांवर मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक संकट ओढवले आहे.
दरम्यान, विरोधकांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून पेपरफुटीचे रॅकेट प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'नीट'नंतर 'टीईटी' पेपरफुटी घडल्याने सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याची कोणतीही चिंता उरलेली नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
विरोधकांच्या मते, राज्यात वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना या केवळ योगायोग नसून शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, निष्काळजीपणा आणि संघटित रॅकेटचे हे गंभीर उदाहरण आहे. दोषींना कठोर शिक्षा होत नसल्यामुळे अशा घटना सातत्याने घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पेपरफुटीच्या प्रकरणात ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातून काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणा या प्रकरणातील संपूर्ण साखळी उघड करण्याचा प्रयत्न करत असून, प्रश्नपत्रिका नेमकी कुठून आणि कशी बाहेर आली याचा शोध घेतला जात आहे.
विरोधी पक्षांनी राज्याचे गृहमंत्री आणि शिक्षण विभागावर थेट जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचा सरकारवरील विश्वास उडाल्याचे सांगत दोषी अधिकारी, दलाल आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, देशभरातही परीक्षांमधील गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 'नीट' पेपरफुटीनंतर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यात आता टीईटी परीक्षाही रद्द झाल्याने स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
याच पार्श्वभूमीवर बिहारमधील पाटणा येथे एका कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचाही उल्लेख करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह त्यांच्या भविष्याबाबत सरकारने अधिक संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.
राज्यात सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनातही हा मुद्दा गाजण्याची शक्यता असून, पेपरफुटी रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, डिजिटल सुरक्षा व्यवस्था आणि दोषींवर जलदगती न्यायालयात खटले चालविण्याची मागणी होत आहे.
शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता आणि परीक्षांवरील विश्वास टिकवण्यासाठी सरकारने तातडीने कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याची भावना विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. पेपरफुटीच्या वाढत्या घटनांमुळे लाखो तरुणांच्या स्वप्नांवर पाणी फेरले जात असून, शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment