कळंब बस स्थानकात अधिकृत सुविधा नसल्याने संताप !
कळंब (कटूसत्य वृत्त):- कळंब एसटी बस स्थानकात स्मार्ट कार्ड काढण्यासाठी अधिकृत सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, याचा फायदा घेत काही एजंटांकडून अवैधरित्या जादा पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, राज्य परिवहन महामंडळाने तात्काळ अधिकृत एजन्सीची नेमणूक करून ही लूट थांबवावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
स्मार्ट कार्ड काढण्यासाठी प्रवाशांना बस स्थानकाबाहेर हेलपाटे मारावे लागत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि अमृत योजनेतील लाभार्थी यांची सर्वाधिक गैरसोय होत असून, आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठीच नागरिकांना खिसा रिकामा करावा लागत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, अधिकृत यंत्रणा नसल्याने या प्रकारांना खतपाणी मिळत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.
याबाबत कळंब आगार प्रमुख विजयकुमार घोलप यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, "कोणीही स्मार्ट कार्डासाठी जादा पैसे घेत असल्याचे आढळल्यास प्रवाशांनी थेट आगार प्रशासनाकडे तक्रार करावी. दोषींवर तात्काळ कारवाई केली जाईल."
प्रवाशांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता कळंब बस स्थानकातच स्मार्ट कार्डसाठी स्वतंत्र काउंटर, अधिकृत एजन्सी आणि कर्मचारी नेमावेत, अशी मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.
स्मार्ट कार्ड नसले तरी सवलत बंद नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका!स्मार्ट कार्ड नसल्यास एसटी प्रवासातील सवलत मिळणार नाही, अशी अफवा काही ठिकाणी पसरवली जात असताना कळंब आगार प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घेत नागरिकांना दिलासा दिला आहे.
आगार प्रमुख विजयकुमार घोलप यांनी सांगितले की, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ७५ वर्षांवरील वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना मिळणारी सवलत स्मार्ट कार्ड नसले तरी सुरूच राहणार आहे. पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार सवलतीचा लाभ दिला जात असून, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
स्मार्ट कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असली तरी अनेक पात्र प्रवाशांकडे अद्याप कार्ड उपलब्ध नाही. त्यामुळे सवलत बंद होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सवलतीची योजना पूर्ववत सुरू राहणार आहे.
कळंब बस स्थानकात स्मार्ट कार्डसाठी अधिकृत एजन्सी नेमावी .
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करावी
स्मार्ट कार्डसाठी अधिकृत काउंटर सुरू करावा
प्रवाशांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात
प्रश्न गंभीर; आता वरिष्ठ अधिकारी जागे होणार का?
स्मार्ट कार्डसारख्या महत्त्वाच्या सुविधेसाठी आजही कळंबकरांना एजंटांच्या भरोशावर राहावे लागत असल्याची वस्तुस्थिती चिंताजनक आहे. प्रवाशांच्या अडचणी, अवैध वसुलीच्या तक्रारी आणि ज्येष्ठ नागरिकांची होणारी हेळसांड लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने तातडीने हस्तक्षेप करून अधिकृत व्यवस्था उभी करणे काळाची गरज बनली आहे. नाहीतर "स्मार्ट कार्ड"च्या नावाखाली सुरू असलेला हा गोंधळ आणि गैरप्रकार आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment