महापौरांच्या प्रभागातच विद्यार्थ्यांची चिखलयात्रा; विकासाच्या दाव्यांना नागरिकांचा सवाल

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहराच्या विकासासाठी मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांची अभ्यासू, शांत, संयमी आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख आहे. मात्र त्यांच्या प्रभाग क्रमांक १२ मधील तिरूमला चौक ते थोबडे वस्ती हा मुख्य रस्ता गेल्या १० ते १५ वर्षांपासून दुरवस्थेत असल्याने त्यांच्या विकासाच्या प्रतिमेलाच प्रश्न उपस्थित होत आहेत. या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, कामगार आणि शेकडो नागरिकांना चिखल, साचलेले पाणी आणि खड्ड्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरून नेताजी शाळा, महात्मा विद्या मंदिर तसेच विविध महाविद्यालयांमध्ये जाणारे विद्यार्थी सायकलीवरून प्रवास करतात. चिखलामुळे त्यांच्या गणवेशावर घाण उडते, अनेकदा घसरून अपघात होण्याची भीती निर्माण होते. कामगार वर्गालाही दररोज याच हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. वर्षानुवर्षे केवळ मुरूम व माती टाकून तात्पुरती दुरुस्ती केली जाते; मात्र कायमस्वरूपी रस्ता करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. या रस्त्याची दुरवस्था वाढण्यामागे महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावेळी रस्त्यावर वाहणारे पाणी आणि परिसरातील काही कारखान्यांकडून रस्त्यावर सोडले जाणारे सांडपाणी हेही प्रमुख कारण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी हा रस्ता वर्षभर चिखलमय राहतो. पाणीगळती तातडीने थांबवून संबंधित कारखानदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातून जोर धरत आहे महापौर विनायक कोंड्याल यांनी गेली अनेक वर्षे या प्रभागाचे नेतृत्व केले असून नागरिकांनी त्यांच्यावर सातत्याने विश्वास व्यक्त केला आहे.

त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या प्रभागातील हा मूलभूत प्रश्न तातडीने मार्गी लागणे हीच नागरिकांची अपेक्षा आहे. शहराच्या विकासाचे नेतृत्व करणाऱ्या महापौरांनी सर्वप्रथम आपल्या प्रभागातील या मुख्य रस्त्याचा प्रश्न सोडवून विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांना चिखलमुक्त व सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी प्रामाणिक भावना स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे. नागरिकांचा विश्वास, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि कामगारांचा दैनंदिन प्रवास या तिन्ही गोष्टींशी निगडित असलेला हा प्रश्न आता आणखी लांबविणे योग्य ठरणार नाही. महापालिका प्रशासनाने पाणीगळतीची कारणे तातडीने शोधून ती बंद करावीत, नियमभंग करणाऱ्या कारखानदारांवर कठोर कारवाई करावी आणि तिरूमला चौक ते थोबडे वस्ती हा रस्ता कायमस्वरूपी दर्जेदार पद्धतीने विकसित करावा, अशी एकमुखी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
No comments:
Post a Comment