एस.एन.डी.स्कूलमध्ये टाळांच्या गजरात दुमदुमला पालखी सोहळा
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- आषाढी एकादशी निमित्त अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात नातेपुते येथील एस.एन.डी. सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, शेंदुर्णी (जळगाव) येथील संजय गरूड, सरोजनी गरूड, रेणुका महिला पतसंस्थेच्या चेअरमन सुचित्रादेवी देशमुख,श्रुतिका देशमुख, अर्जून जठार यांच्या शुभहस्ते पालखीचे पूजन करून आरती करण्यात आली.
या भक्तिमय सोहळ्यात मुख्याध्यापक संदीप पानसरे, उपमुख्याध्यापक शकूर पटेल, प्राथमिक विभाग प्रमुख नीलम डोंबाळे, पीआरओ मनोज राऊत यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी तसेच बाल वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. संतांच्या अभंगांचा गजर, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि फुगड्यांच्या आनंदी खेळांमुळे प्रमुख मान्यवर शिक्षक व विद्यार्थी भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.
नर्सरी ते इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी श्री संत ज्ञानेश्वर, श्री संत तुकाराम, मुक्ताई तसेच लहान मोठे विद्यार्थी धोतर, कुर्ता, गांधी टोपी आणि विद्यार्थिनी नऊवारी साडीत डोक्यावर तुळश घेऊन शाळेत आल्या होत्या
बाल वारकऱ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "रामकृष्ण हरी"च्या जयघोषात पालखी घेऊन स्कूलच्या परिसरातुन प्रदक्षिणा केली. ही बालदिंडी स्कूलच्या मैदानात पोहोचल्यानंतर पारंपरिक पद्धतीने औक्षण करून बाल वारकऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत केले.या प्रसंगी ग्रामस्थांनी बालचमूंचे व विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाचे मनापासून कौतुक केले.शेवटी सामूहिक भजन व भावगीताने या भक्तिमय आणि चैतन्यमय सोहळ्याची सांगता करण्यात आली.
चौकटीत :
महाराष्ट ही संतांची भूमी आहे. अनेक शतकांपासून चालत आलेली पंढरपूरची वारी ही आपल्या महाराष्ट्राचे वैभव आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. आज तोच भक्तीचा आणि शिस्तीचा सोहळा आपण आपल्या एस.एन.डी स्कूलच्या प्रांगणात आपल्या सर्वांना अनुभवायला मिळाला. विठू माऊलीच्या जयघोषाने आणि ज्ञानोबा - तुकाराम च्या गजराने . स्कूलचा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्याच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. समृध्द परंपरेची ओळख व एकत्र राहण्याची भावना आपल्यात निर्माण होते.
बाबाराजे देशमुख
संस्थापक अध्यक्ष : एस.एन.डी.इंटरनॅशनल स्कूल, नातेपुते.

No comments:
Post a Comment