नेरले–गौंडरे रस्त्याला अखेर मुहूर्त; औदुंबरराजे भोसले यांच्या इशाऱ्यानंतर कामाला वेग
करमाळा (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील नेरले ते गौंडरे या रस्त्याच्या प्रलंबित कामाबाबत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेत कामास सुरुवात केली आहे. या रस्त्याचे खडीकरण व कच्चे डांबरीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते. मात्र, त्यानंतर होणे अपेक्षित असलेले पक्के डांबरीकरण अद्याप झाले नव्हते. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून नागरिकांचा प्रवास धोकादायक बनला होता. या पार्श्वभूमीवर नेरलेचे माजी सरपंच तथा हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक श्रीमंत औदुंबरराजे भोसले यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर १० जुलै रोजी कामाला प्रारंभ करण्यात आला.
नेरले–गौंडरे मार्गावरील काम रखडल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून अनेक जण जखमी झाले आहेत. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत होता. काही विद्यार्थ्यांच्या सायकलींचे चिमटे मोडल्याने त्यांना सायकली डोक्यावर घेऊन प्रवास करावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर नेरलेहून गौंडरेकडे जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचा दररोज या रस्त्यावरून प्रवास होतो. तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी करमाळा, परांडा आणि बार्शीकडे ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या रस्त्याचा मोठा उपयोग होतो. परांडा बाजारपेठ जवळ असल्याने या मार्गाचे महत्त्व अधिक असून रस्ता तातडीने पूर्ण होणे गरजेचे होते.
रस्त्याचे काम मंजूर असूनही प्रत्यक्षात काम सुरू होत नसल्याने ३ जून २०२६ रोजी काम तात्काळ सुरू न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता श्री. पवार यांनी संबंधित ठेकेदाराला काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आज दि. १०/०७/२०२६ रोजी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या कामाचे पूजन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण उर्फ बप्पासाहेब शेळके आणि पालक समिती सदस्य श्री. सौदागर गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. सुनील लोखंडे, माजी सरपंच अंकुश हंडाळ, माजी सरपंच काकासाहेब पाटील, युवराज महाडिक, आबा सावंत, सुग्रीव लोंढे, आजिनाथ लोंढे, आकाश शेळके, बजरंग शेळके यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित नागरिकांनी रस्त्याच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वी झालेली कामे मजबूत नसल्याने अल्पावधीतच रस्त्यावर खड्डे पडल्याची खंत व्यक्त करत, अंदाजपत्रकानुसार आणि दर्जेदार पद्धतीनेच काम व्हावे, अशा सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ले, इमारती, रस्ते, पूल तसेच राणी अहिल्यादेवींच्या काळातील मंदिरे, घाट, रस्ते आणि राजवाडे आजही सुस्थितीत आहेत; मात्र आजच्या काळात टक्केवारीच्या कामामुळे रस्ते वर्षभरही टिकत नाहीत,” अशा शब्दांत उपस्थितांनी संताप व्यक्त केला.
रस्त्याचे काम सुरू झाल्याने नेरले आणि परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत बोलताना श्रीमंत औदुंबरराजे भोसले यांनी आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा परिषद गटनेत्या रश्मीदीदी बागल, युवा नेते दिग्विजय भैया बागल, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता श्री. पवार तसेच तालुक्यातील पत्रकार बांधव यांचे मनःपूर्वक आभार मानले.

No comments:
Post a Comment