अकलूज परिसरात बोअरवेलच्या मालकांकडून नागरिकांची लूट
अकलूज (विलास गायकवाड):- अकलूज परिसरात काही बोअरवेल मालक यांच्याकडून, नागरिकांची मोठी लूट व फसवणूक होत असून, प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून, गेले वर्षभरात अकलूजसह, माळशिरस तालुक्यातील घरगुती व शेतीसाठी घेण्यात आलेल्या बोअरवेल, नियमबाह्य पद्धतीने घेण्यात आले आहे का? किंवा नियमांच्या अधीन राहून खोदकाम केले आहे का? याची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषी आढळल्यास, त्यांचेवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पाणी हेच जीवन आहे आणि ते नाही मिळाले तर, मानवी जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो? काही प्रमाणात अकलूज मध्ये असाच अनुभव नागरिकांना आला आहे. तत्पूर्वी उन्हाची तीव्रता, पावसाबद्दल हवामान खात्याचा अंदाज,याचा विचार करून, इतरांनाही मोफत पाणी देता येईल आणि स्वतःलाही वापरता येईल म्हणून,अकलूज येथील काही लोकांनी,अकलूज परिसराच्या आसपास, असलेल्या स्वतःच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर बोअरवेल घेतली. परंतु बोरवेल चालकांकडून, आठशे फुटांच्या पुढे खोदकाम होऊनही, घेण्यात आलेल्या बोअरवेलला पाणी लागले नाही. उलट बोरवेल चालकाने व एजंटने संगनमताने लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न केला आहे. सदरची बाब अत्यंत गंभीर असून, माळशिरस तालुक्यात घेण्यात आलेल्या घरगुती व शेती वापरासाठी तसेच सार्वजनिक बोरवेलची चौकशी होणे गरजेचे आहे. अन्यथा सदर बोरवेल चालक-मालक शासनाचे नियम धाब्यावर बसवून जनतेची लूट सुरूच ठेवतील यात शंका नाही असे बोलले जात आहे.
चौकट
भारतात किंवा महाराष्ट्रात बोरवेल घेताना, महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) अधिनियम आणि केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे (CGWA) नियम लागू होतात.
या नियमांनुसार, बोरवेल खोदण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक असते, पाण्याची योग्य खोली व सुरक्षित अंतराचे निकष पाळणे बंधनकारक आहे.
बोरवेल खोदण्यासाठी,
कायदेशीर परवानगी व नोंदणी परवाना व एनओसी आवश्यक आहे. बोरवेल खोदण्याआधी, महाराष्ट्र भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था (GSDA) किंवा स्थानिक प्राधिकरणाकडून (उदा. ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका) परवानगी व 'ना हरकत प्रमाणपत्र' घेणे बंधनकारक आहे.नोंदणीकृत व्यावसायिक, बोरवेलचे काम फक्त GSDA कडे नोंदणीकृत असलेल्या, व्यावसायिकाकडूनच करून घेणे बंधनकारक आहे.
प्रमाणपत्र लावणे, बोरवेल पूर्ण झाल्यावर खोदकाम करणाऱ्या एजन्सीचे प्रमाणपत्र व नोंदणी क्रमांक दर्शनी भागात लावणे आवश्यक असते.
सुरक्षिततेचे नियम,खोलीचे नियम: भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी बोरवेलची खोली साधारणपणे २०० फुटांपेक्षा (६० मीटर) जास्त नसावी, असे काही नियमांत नमूद केले आहे.
विनापरवाना बोरवेल घेतल्यास किंवा नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते.
पहिल्या गुन्ह्यासाठी १०,००० रुपये दंड आणि दुसऱ्या गुन्ह्यास ६ महिने तुरुंगवास किंवा २५,००० रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद आहे.
चौकट
अकलूजसह माळशिरस तालुक्यातील काही बोरवेल मालकांकडून शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे.
शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत,अकलूजसह माळशिरस तालुक्यातील, बोरवेल चालक-मालक यांच्याकडून मोठी लूट होत आहे. काही बोरवेल मालकांनी एजंट मार्फत लुटीचा धंदा सुरू केला आहे. असेच काही एजंट, लोकांच्या मजबूरीचा फायदा घेऊन, लूटमार करताना समोर आले आहेत. शिवाय काहीं नागरिकांना बोरवेल बद्दलचे नियम माहित नसतात,चालक मालक आणि एजंट यांनी बोर घेण्याबाबतचे नियम सांगणे गरजेचे असते. परंतु असे न करता, त्यांना अंधारात ठेवून, सातशे आठशे फुटापर्यंत बोर घेऊन, सदर नागरिकाची फसवणूक केली जाते. त्यांच्याकडून दमदाटी करून रक्कम उकळण्याचा प्रयत्न केला जातो.

No comments:
Post a Comment