डबल तेलाच्या वापरावर एफडीएची करडी नजर; हॉटेलमध्ये शुद्ध पाणी मोफत देणे बंधनकारक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 29, 2026

डबल तेलाच्या वापरावर एफडीएची करडी नजर; हॉटेलमध्ये शुद्ध पाणी मोफत देणे बंधनकारक

डबल तेलाच्या वापरावर एफडीएची करडी नजर; हॉटेलमध्ये शुद्ध पाणी मोफत देणे बंधनकारक



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून वापरल्या जाणाऱ्या तेलाच्या पुनर्वापरावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) करडी नजर ठेवली असून ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. यासोबतच सर्व हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना शुद्ध पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत 'सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व खाद्यव्यावसायिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्देश जाहीर केले. त्यानुसार प्रत्येक हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ विक्रेत्याने ग्राहकांना सुरक्षित व पिण्यायोग्य पाणी मोफत उपलब्ध करून द्यावे. तसेच "येथे शुद्ध पिण्याचे पाणी मोफत मिळेल" असा फलक दर्शनी भागात लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.

याशिवाय स्वयंपाक किंवा तळण्यासाठी एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वारंवार वापरलेल्या तेलामुळे कर्करोगासह विविध गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याने अशा प्रकारावर एफडीएने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अक्कलकोट तालुका व परिसरात शुद्ध जारच्या पाण्याच्या नावाखाली ग्राहकांची दिशाभूल होत असल्याची चर्चा आहे. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून जारच्या पाण्याची गुणवत्ता आणि त्यावरील नियंत्रणाबाबतही एफडीएने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

यापूर्वी गुटखा, मावा आणि दूध भेसळविरोधात विशेष मोहीम राबविणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाने आता अशुद्ध पाणी, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि वापरलेल्या तेलाच्या पुनर्वापराविरोधातही व्यापक मोहीम सुरू केली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही आस्थापनाला पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages