माढ्यात प्रशासकीय इमारतीसाठी ५.३२ कोटींचा निधी मंजूर; कामाला मिळणार गती
माढा (कटूसत्य वृत्त) : माढा येथील प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून, या प्रकल्पासाठी ५ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे रखडलेल्या या महत्त्वाच्या प्रकल्पाला गती मिळणार असल्याची माहिती माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी दिली.
यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीच्या आराखड्यात तसेच बांधकामाच्या क्षेत्रफळात वाढ करण्यात आली होती. वाढीव बांधकामामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक होती. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाकडे आमदार अभिजित पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता देत ५ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या इमारतीमुळे महसूल, पंचायत, कृषी, निबंधक तसेच इतर महत्त्वाच्या शासकीय विभागांची कार्यालये एकाच छताखाली कार्यरत होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांत धावपळ करावी लागणार नाही. आधुनिक आणि सुसज्ज प्रशासकीय इमारतीमुळे तालुक्यातील नागरिकांना अधिक सुलभ व दर्जेदार शासकीय सेवा उपलब्ध होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
या प्रकल्पामुळे माढा तालुक्याच्या प्रशासकीय सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून नागरिकांच्या वेळेची आणि श्रमांची बचत होणार आहे. तसेच विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय वाढून प्रशासन अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment