एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रसिद्ध योग प्रशिक्षक ऋषिकेश राजेश पुट्ठा यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील आणि ज्युनिअर काॅलेजचे प्राचार्य राजकुमार गायकवाड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
योग दिनानिमित्त आयोजित विशेष सत्रात ऋषिकेश पुट्ठा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत योगामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि भावनिक फायदे सविस्तरपणे सांगितले. त्यांनी स्वतःचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवत नियमित योगाभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. तसेच विविध योगासने, प्राणायाम आणि श्वसनाच्या व्यायामांचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध योगासने केली. योगामुळे एकाग्रता, लवचिकता, आत्मविश्वास आणि मानसिक शांतता वाढते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले आणि निरोगी, आनंदी व शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारण्याची प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अजय पारिक, राहुल जाधव, आश्विनी पांढरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
"योग ही केवळ व्यायामपद्धती नसून निरोगी, सुदृढ आणि संतुलित जीवन जगण्याची जीवनशैली आहे," हा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये योगाचे महत्त्व रुजविणे तसेच निरोगी व संतुलित जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी सांगितले.
.png)
No comments:
Post a Comment