वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोलापूर जिल्हा परिषद सज्ज - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 24, 2026

वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोलापूर जिल्हा परिषद सज्ज

 वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोलापूर जिल्हा परिषद सज्ज





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत असलेल्या विविध सेवा-सुविधा, विकासकामे आणि पूर्वतयारीची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या सुरक्षित, सुखकर व आरोग्यदायी प्रवासासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार उपस्थित होते.
पालखी सोहळा जिल्ह्यातील ८१ गावांमधून मार्गक्रमण करणार असून ३८ मुक्काम, ४३ विसावे आणि ७ रिंगण सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने ५ हजार तात्पुरती व फिरती शौचालये उभारण्यात येणार आहेत. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी दररोज १८०० तर संत तुकाराम महाराज पालखीसाठी १२०० शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र ५०० स्नानगृहांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पालखी मार्गावर २२० पाण्याचे टँकर तैनात करण्यात आले आहेत. सर्व पाणी स्रोतांची तपासणी करूनच पाणीपुरवठा केला जाणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रांतर्गत २३ जर्मन हँगर आणि ३७ वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी ओपीडी सेवा, हिरकणी कक्ष, मोबाईल चार्जिंग सुविधा, पंखे आणि विश्रांतीची व्यवस्था उपलब्ध राहणार आहे.
आरोग्य विभागामार्फत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १३ ‘मेडिसिन ऑन व्हील’ आरोग्य रथ २४ तास कार्यरत राहणार आहेत. याशिवाय १५८ तात्पुरती आरोग्य सल्ला केंद्रे, १२१ बाईकवरील आरोग्य दूत आणि २१ आपत्कालीन आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेसाठी ४४० वैद्यकीय अधिकारी, ४३५ कर्मचारी आणि २,८२२ आशा सेविका कार्यरत राहणार आहेत.
वारकऱ्यांच्या सुविधेसाठी ७५० चरणसेवा (फूट मसाजर) मशीन, १५ मोबाईल चार्जिंग व्हॅन, १६७ हिरकणी कक्ष तसेच सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि डिस्पोजल मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पालखी मार्गावर मोफत जल सलून केंद्रेही सुरू करण्यात येणार आहेत.

वारी काळात स्वच्छता, जंतुनाशक फवारणी, कचरा व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा तपासणीची विशेष काळजी घेण्यात येणार असून लाखो वारकऱ्यांचे सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यासाठी संपूर्ण जिल्हा परिषद प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages