अंजुमने इस्लाहूल मुस्लिमीन संस्थेतर्फे शनिवारी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव
वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी उपस्थित राहणार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अंजुमने इस्लाहूल मुस्लिमीन, फॉरेस्ट (सोलापूर) या संस्थेतर्फे अल्पसंख्याक समाजातील दहावी व बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवार, दि. १३ जून रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव मोहम्मद शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून, खा. प्रणिती शिंदे, खा. डॉ. ज्योती वाघमारे , पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी पोलीस आयुक्त हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत,
कार्यक्रमानंतर वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी हे सोलापूर शहर व जिल्ह्यातील वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनाशी संबंधित ट्रस्टी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. अंजुमने इस्लाहूल मुस्लिमीन ही संस्था गेल्या ७५ वर्षांपासून धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या ज्येष्ठ संचालकांनी कार्यभार नव्या पिढीकडे सोपवल्यानंतर युवा संचालकांच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील कष्टकरी व गरजू नागरिकांना मदत करण्याबरोबरच गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुणांचा गौरव करण्याचे उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.
या पत्रकार परिषदेला हाजी शकील शेख, ॲड. मो. ईसा शेख, मोहसिन बेरिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment