स्मार्ट सिटीत कचरा उचलण्याबाबत दुर्लक्ष - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 11, 2026

स्मार्ट सिटीत कचरा उचलण्याबाबत दुर्लक्ष

 स्मार्ट सिटीत कचरा उचलण्याबाबत दुर्लक्ष 

सम्राट चौकातील तिरुपती हॉटेल लॉज बिल्डिंगमागे व रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य 






 सोलापूर(कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील कचरा उचलण्याबाबत महापालिकेचे नियोजन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट सिटीतील सुंदर अशा सम्राट चौक परिसरातील एका पडीक हॉटेलच्या मागे रस्त्यावर व मागील बाजूस कचऱ्याचा ढिगारा अनेक  दिवसांपासून पडून आहे. 

सोलापूर शहरातील कचरा उचलण्याची समस्या ही शहरवासीयांचे कायमचे दुखणे झाली आहे. मागील वर्षात महापालिकेने अतिरिक्त घंटागाड्या घेतल्या आहेत. मात्र तरीही केवळ योग्य लक्ष न दिल्याने काही भागात अनेक दिवसांपासून कचरा पडून असल्याचे दिसून येते. असाच कचऱ्याचा ढीग सम्राट चौकातील एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर असलेल्या तिरुपती हॉटेल लॉज या पडीक बिल्डिंगच्या मागील बाजूस अनेक दिवसांपासून पडून आहे.  संबंधित ठिकाणचा कचरा पाहिला असता तो सुमारे 15 दिवस ते महिनाभरापासून उचलला गेला नसल्याचे दिसून येते. या भागात पडीक लॉज च्या शेजारी असलेल्या रस्त्यावर व त्याच्या पाठीमागील बाजूस मोठ्या प्रमाणात कचरा, राडारोडा साठला आहे. याच कचऱ्यावर म्हशी, कुत्री अशी जनावरे खाण्यासाठी येतात. या रस्त्यावरून जवळपास दोन-तीन अपार्टमेंट व नगर असा रहिवास आहे. लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात 60 ते 100 कुटुंबे राहतात. मात्र त्यांच्या प्रवेशाच्या रस्त्यावरच प्रचंड मोठा कचरा पडलेला आहे. दोन दिवसा खाली पडलेल्या पावसाचा ओलावा त्या कचऱ्यात साठल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंध येत आहे. याबाबत तक्रारी काही लोकांनी केल्या. स्थानिकांनी म्हटल्याप्रमाणे सम्राट चौक ते शिवाजी पुतळा परिसराचा रस्ता स्वच्छ करण्यासाठी जेव्हा महापालिकेचे लोक येतात, तेव्हा ते देखील आपला कचरा याच ठिकाणी टाकतात. नागरिकांनी वारंवार सांगूनही असा प्रकार घडत आहे. ही व्यवस्था सोलापूरसारख्या स्मार्ट सिटीसाठी निश्चितच चांगली नाही. 


 काही महिन्यांपूर्वी महापालिकेने स्वच्छता मोहीम राबवताना जिथे वारंवार कचरा पडून असतो, अशा ठिकाणांची स्वच्छता करून तेथे "स्वच्छोबा प्रसन्न " असे रंगवण्याची मोहीम काढली होती. ती मोहीम या ठिकाणी राबवली गेली होती का हा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच आता ती मोहीम पून्हा चालू करण्याची गरज आहे. 


 घंटागाड्या नागरिकांच्या घरातून कचरा गोळा करतात मात्र जो कचरा असा रस्त्यावर पडलेला आहे, तो उचलण्यासाठी काही व्यवस्था आहे का नाही? असल्याच तिचे या ठिकाणी दुर्लक्ष कसे काय हा मोठा प्रश्न आहे. महापालिका प्रशासनाने या ठिकाणचा कचरा तातडीने उचलावा अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages