मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल होत असलेल्या खोट्या गुन्ह्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांना भेटणार- बिलालभाई शेख
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील अवैध व्यवसायाबरोबर संघटित गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने सातत्याने दक्ष राहणे गरजेचे आहे. विविध झालेल्या घटना आणि प्रकारांची खात्री करूनच गुन्हे दाखल होणे अत्यावश्यक बाब आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून कथीत घटना आणि फेक गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. यापुढील काळात मोहोळ पोलीस प्रशासनाने नीट खात्री न करता घाईत खोटे गुन्हे दाखल होऊ नये त्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मोहोळ पोलिसांना आवश्यक त्या सूचना देणे गरजेचे आहे. खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी न झाल्यास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा यांची भेट घेऊन मोहोळ पोलीस प्रशासनाच्या खोटे गुन्हे दाखल करण्याच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती मोहोळचे माजी सरपंच हाजी बिलाल शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मोहोळ पोलीस प्रशासनात एजंट मध्यस्थ आणि दलालांचा वावर वाढला आहे. याच व्यक्ती पोलीस स्टेशनचा कारभार आपल्या हातात असल्यागत पोलीस स्टेशन परिसरात चोवीस तास उपलब्ध असतात. एखाद्या घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलीस निरीक्षकांना समजण्याच्या अगोदरच यांना समजते आणि ते आरोपींना सावध करून पळवून लावतात. अशाच दलालांचे मोहोळ पोलीस प्रशासनातील काही पोलीस कर्मचारी हस्तक बनले आहेत. मोहोळ सारख्या अत्यंत हेवी बीटला अकार्यक्षम पोलिसांची वर्णी पोलीस प्रशासनाकडून लावण्यात आली आहे. या बीट मधील कर्मचाऱ्यांची अवस्था खायला कार आणि भुईला भार या धोरणाप्रमाणे असून काम कमी आणि वसुलीचा दाम जादा अशी बिकट अवस्था या बीटची झाली आहे. अशा हुकूमशाही स्वभावशैलीच्या कर्मचाऱ्यांमुळे साहजिकच मोहोळ पोलिसांची प्रतिमा मलिम होत आहे याची आम्हाला देखील खंत वाटते असेही यावेळी माजी सरपंच बिलालभाई म्हणाले.
चौकट
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अशीच एक किरकोळ वादाची घटना घडली आणि त्यामध्ये पोलिसांनी अत्यंत चुकीची भूमिका घेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे काही युवकावर दाखल केले.सदर प्रकाराची देखील चौकशीची मागणीही पोलीस अधीक्षकांना भेटून करणार आहे. याबाबत प्रशासनाकडून ठोस भूमिका घेतली न गेल्यास मुख्यमंत्री तथागृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार भाऊ गोरे, ज्येष्ठ नेते राजन पाटील यांना भेटून देखील या गंभीर प्रकाराबाबत माहीती देणार आहे असेही यावेळी माजी सरपंच हाजी बिलाल शेख म्हणाले.

No comments:
Post a Comment