पावसाळ्यापूर्वी महापालिकेची धडक कारवाई; धोकादायक इमारतींमधून कर्मचाऱ्यांचे स्थलांतर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 12, 2026

पावसाळ्यापूर्वी महापालिकेची धडक कारवाई; धोकादायक इमारतींमधून कर्मचाऱ्यांचे स्थलांतर

 पावसाळ्यापूर्वी महापालिकेची धडक कारवाई; धोकादायक इमारतींमधून कर्मचाऱ्यांचे स्थलांतर



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या बुधवार पेठ व सात रस्ता येथील निवासस्थानांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे सोलापूरचे प्रथम नागरिक तथा महापौर विनायक कोंडयाल यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी बुधवार पेठ व सात रस्ता येथील महानगरपालिकेच्या निवासस्थाने अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतींमध्ये कोणतीही अनुचित अथवा दुर्घटनाजन्य घटना घडू नये, तसेच तेथे वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
बैठकीत महापौर विनायक कोंडयाल यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, दोन्ही ठिकाणच्या जीर्ण इमारतींमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तातडीने स्थलांतर करावे, असे निर्देश दिले. संबंधित कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या स्तरावर पर्यायी निवासाची व्यवस्था करावी अथवा सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निवासस्थानी स्थलांतरित व्हावे, अशी माहिती त्यांनी दिली.
महापौरांनी प्रशासनाला या संदर्भातील कार्यवाही युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना देत, पावसाळ्यापूर्वी सर्व धोकादायक इमारती रिकाम्या करून नागरिक व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. तसेच कर्मचाऱ्यांना स्थलांतर प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक समन्वय साधण्याचेही आदेश देण्यात आले.
बैठकीत विविध पर्यायी निवासव्यवस्थांचा आढावा घेण्यात आला असून, सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सुसज्ज निवास उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, नगरसेविका रोहिणी तडवळकर, नगरसेवक अनंत जाधव, नगरसेवक विनायक विटकर, भरतसिंग बडूरवाले, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, उपाध्यक्ष, उपायुक्त आशिष लोकारे, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, कामगार नेते अशोक जानराव, साहेबराव गट्टू, प्रवीण कांबळे, बापूसाहेब सदाफुले, बाळासाहेब सुरवसे, अश्विनी चव्हाण, शेषराव शिरसाट, प्रीती उडाणशिवे, दशरथ अडकूल, सुभान स्वाके, पी. पी. जाधव, जनार्दन शिंदे, चांगदेव सोनवणे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.
सोलापूर महानगरपालिका आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत कटिबद्ध असून, पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages