नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई,५४,४०० रुपयांचा दंड वसूल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 12, 2026

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई,५४,४०० रुपयांचा दंड वसूल

 नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई,५४,४०० रुपयांचा दंड वसूल




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते शहर आणि परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी नातेपुते पोलिसांच्या वतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी विविध कलमांखाली एकूण ७८ केसेस दाखल करून ५४,४०० रुपये इतका दंड वसूल केला आहे.सध्या नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याचे दिसून येत होते. याला शिस्त लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. या कारवाईत प्रामुख्याने खालील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात आली.
नो पार्किंग बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवर अस्ताव्यस्त वाहने लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.ड्रिंक अँड ड्राईव्ह मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या तळीरामांना पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला.ट्रिपल सीट दुचाकीवर क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच तीन सीट प्रवास करणाऱ्या हुल्लडबाज तरुणांवर कडक कारवाई करण्यात आली.फॅन्सी नंबर प्लेट नंबर प्लेटवर फॅन्सी अक्षरे, नावे किंवा नियमानुसार नसलेले नंबर टाकून फिरणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करत नंबर प्लेट बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मोबाईल टॉकिंग वाहन चालवताना मोबाईलवर बोलून लक्ष विचलित करणाऱ्या आणि अपघाताला निमंत्रण देणाऱ्या चालकांवरही पोलिसांनीकारवाईचा बडगा उगारला आसुन सदर कारवाई मा.उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल सुधीर हंगे व रमेश बोराटे यांनी केली आहे. सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. यापुढेही नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आवाहन नातेपुते पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.

चौकटीत :
पोलीस प्रशासनाचे आवाहन:
"ही कारवाई केवळ दंड वसूल करण्यासाठी नसून वाहनचालकांमध्ये शिस्त लागावी आणि रस्ते अपघात टळावेत यासाठी आहे. नागरिकांनी आणि वाहनधारकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. वाहन चालवताना सीट बेल्ट, हेल्मेटचा वापर करावा आणि वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. यापुढेही ही कारवाई अशीच तीव्र गतीने सुरू राहणार आहे."

विशाल वायकर (सपोनि नातेपुते पोलीस ठाणे)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages