महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील विकास कामांची महापालिका आयुक्तांकडून पाहणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 25, 2026

महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील विकास कामांची महापालिका आयुक्तांकडून पाहणी

 महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील विकास कामांची महापालिका आयुक्तांकडून पाहणी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयामध्ये विकास निधी तसेच एनटीपीसी (NTPC) च्या सीएसआर (CSR) निधीतून सुरू असलेल्या विविध विकास कामांची महापालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता, प्रगती व आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
पाहणीदरम्यान आयुक्तांनी मोर पक्ष्यांसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या पिंजऱ्याची तसेच वाघ आणि बिबट्या यांच्यासाठी उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक पिंजऱ्यांची पाहणी केली. याशिवाय एनटीपीसीच्या सीएसआर निधीतून प्राण्यांसाठी उभारण्यात आलेल्या विशेष निवाऱ्यांचाही आढावा घेण्यात आला. ही सर्व कामे दर्जेदार व निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
मागील काळात प्राणी संग्रहालय परिसरात पाणी साचल्याच्या घटना घडल्याने आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत संग्रहालयालगतच्या नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण युद्धपातळीवर हाती घेण्याचे निर्देश दिले. यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होऊन संग्रहालय परिसरात पूरस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगितले.
संग्रहालयाच्या बाजूच्या मैदानात वाढलेली वेडी बाभळीची झाडे मुळासकट काढून परिसर स्वच्छ व सुशोभित करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. तसेच प्राणी संग्रहालय व परिसरातील स्वच्छतेबाबत कोणतीही हयगय सहन केली जाणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
पाहणीदरम्यान परिसरातील एका विहिरीवर रेल्वे प्रशासनाकडून दावा केला जात असल्याची बाब निदर्शनास आली. त्यानुसार संबंधित जागेच्या मालकी हक्काबाबत रेल्वे प्रशासनाकडे अधिकृत पत्राद्वारे माहिती मागविण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच आधार हॉस्पिटल ते मंदिर परिसरादरम्यानच्या रस्त्यालगत तसेच महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. यासाठी संबंधितांना नोटिसा बजावून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
यावेळी आयुक्तांनी सांगितले की, "महात्मा गांधी प्राणी संग्रहालय हे शहरातील महत्त्वाचे पर्यावरणीय व पर्यटनस्थळ असून येथे सुरू असलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. प्राण्यांच्या सुरक्षिततेसोबतच नागरिकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. पूर नियंत्रण, स्वच्छता आणि अतिक्रमण निर्मूलन या बाबींना प्राधान्य देऊन आवश्यक कारवाई करण्यात येईल."
या पाहणी दौऱ्याप्रसंगी महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे नीलकंठ मठपती, विभागीय अधिकारी जावेद पानगल,गोकुळ चिंतारे, अविनाश वाघमारे, चेतन प्रचंडे, स्वप्नील सोलणंकर विभागप्रमुख, अभियंते व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages