दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३५ शिक्षकांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती दक्षिण सोलापूर यांच्यावतीने जानेवारी ते मे महिन्यापर्यंत सेवानिवृत्त झालेल्या तालुक्यातील ३५ शिक्षकांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथील बहुउद्देशीय सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव शिवाजी शिंदे, मोहोळचे गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक, जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी हरिष राऊत, दक्षिणचे प्र. गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार,शिक्षण विस्तार अधिकारी मल्लिनाथ स्वामी, विस्तार अधिकारी गुरुबाळ सणके आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात जयश्री सुतार म्हणाल्या,सेवानिवृत्त होणारे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या योगदानाबद्दल दक्षिण तालुक्याचे नाव लौकिक झाली आहे.पंचायत समिती शिक्षण विभागाचे कर्तव्य मानून तालुक्यातील ३५ सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनींचा सत्कार करण्यात येत असल्याचे सांगितले. गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक म्हणाले , सेवानिवृत्ती होणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी यापुढेही समाजसेवा म्हणून आपली जिल्हा परिषद शाळा टिकण्यासाठी, शाळांतील पटसंख्या वाढीसाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.अतिथी हरिष राऊत म्हणाले,समाजात शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने आजही आपल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना मानाचे स्थान आहे.शिक्षकांचे कार्य हे समाजातील सर्वश्रेष्ठ कार्य असल्याचे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुणे शिवाजी शिंदे म्हणाले, शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ आहे. देशाच्या विकासात शिक्षकांचे योगदान अनमोल असून विविध शासकीय जबाबदाऱ्याही शिक्षक यशस्वीपणे पार पाडत असतात. त्यामुळे शिक्षकांनी समाजासाठी कार्यरत राहावे, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षकांचा फेटा, शाल तसेच पेरू व पिंपळाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. पेरूची रोपे आधार प्रतिष्ठानच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती वाघमारे यांनी केले तर नागनाथ स्वामी यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व केंद्रप्रमुख, सर्व विशेष शिक्षक, बीआरसी कर्मचारी, किरण सगेल, अमृता कोठेकर, बी. डी. राठोड आदींनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment