अल्पवयीन माता शोध मोहिमेत कार्यरत आशा सेविकांना धमक्या; कारवाईची मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यभर सुरू असलेल्या अल्पवयीन माता शोध व नियंत्रण मोहिमेत कार्यरत असलेल्या आशा वर्कर्स, आरोग्य सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तींवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच कर्मचाऱ्यांची नावे गोपनीय ठेवावीत, अशी मागणी लाल बावटा आशा वर्कर्स संघटनेने महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभरात अल्पवयीन मातांच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. या अंतर्गत आशा सेविका व आरोग्य कर्मचारी माहिती संकलनाचे महत्त्वाचे काम करत आहेत. मात्र, गोपनीय ठेवण्याची अट असतानाही काही ठिकाणी संबंधित अल्पवयीन माता आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत माहिती पोहोचत असल्याची बाब समोर आली आहे.
यामुळे अनेक भागांत आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही प्रकरणांमध्ये अल्पवयीन माता आढळून आल्यानंतर संबंधित व्यक्तींनी आशा वर्कर्सना धमकीचे फोन केल्याची माहिती पुढे आली आहे. शिवीगाळ, मानसिक दबाव आणि दमदाटीचे प्रकारही वाढल्याचा दावा आशा सेविकांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर आशा सेविका आणि त्यांच्या प्रतिनिधींनी महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच धमक्या देणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली.
"ही नावे बाहेर कशी जातात?"
लाल बावटा आशा वर्कर्स संघटनेच्या जिल्हा सचिवा पुष्पा पाटील यांनी या प्रकरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केला. “आशा वर्कर्स आणि संबंधित कर्मचारी अल्पवयीन मातांची नोंदणी करून ती माहिती वरिष्ठांकडे देतात. ही माहिती गोपनीय ठेवली जाते. मात्र संबंधित कुटुंबीय आणि आशा वर्कर्सची नावे बाहेर कशी पोहोचतात? त्यामुळे काही आशा सेविकांना नातेवाईकांकडून धमक्या दिल्या जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
आरोग्य विभागाची मोहीम अल्पवयीन मातांच्या घटनांवर नियंत्रणासाठी महत्त्वाची ठरत असली, तरी प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे.
.png)
No comments:
Post a Comment