जिल्हा प्रशासनाचा पर्यावरणपूरक उपक्रम , दर मंगळवारी 'नो व्हेईकल डे'
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आता सोलापूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांमध्ये दर मंगळवारी 'नो व्हेईकल डे' साजरा करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत व पर्यावरण संरक्षणासाठी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून यापूर्वी सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेकडून 'नो व्हेईकल डे' उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर आता जिल्हा प्रशासनानेही यात सहभाग घेतला आहे.
आज मनपा आणि जिल्हा परिषदेतील अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांनी विविध पर्यायी प्रवास साधनांचा वापर करत एक वेगळाच आदर्श घालून दिला. काहींनी सायकल, काहींनी सार्वजनिक वाहतूक तर काहींनी पायी प्रवास करत या मोहिमेत सहभाग नोंदवला.
अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे 'नो व्हेईकल डे' हा केवळ औपचारिक उपक्रम न राहता प्रत्यक्ष कृतीतून दिलेला पर्यावरणपूरक संदेश ठरला आहे. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे इंधन बचत, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीला चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment