आमदारांनी विकासकामांचा हिशोब द्यावा - वनिता गुळवे
कन्हेरगांव (कटूसत्य वृत्त):- डिकसळ ते कोंढारचिंचोली दरम्यान उभारण्यात येणाऱ्या नवीन पुलाच्या कामाचे श्रेय माजी आमदार संजयमामा शिंदे यांनाच जाते, असा दावा करत विद्यमान आमदारांनी गेल्या दोन वर्षांत तालुक्यात मंजूर केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या वनिता सुभाष गुळवे यांनी केली आहे.
बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी नुकतीच डिकसळ–कोंढार चिंचोली पुलाच्या कामाची स्थळ पाहणी केली. यावेळी त्यांनी या पुलासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतल्याचा दावा केला.
या पार्श्वभूमीवर पाटील गटाकडून करण्यात आलेल्या श्रेयवादाच्या वक्तव्यांना उत्तर देताना वनिता गुळवे यांनी विद्यमान आमदारांवर टीका केली. त्या म्हणाल्या की, “या पुलासाठी तब्बल ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र त्यानंतरच्या काही राजकीय घडामोडींमुळे हे काम रखडले. कॉन्ट्रॅक्टरवर दबाव टाकून काम प्रलंबित ठेवण्याचे प्रकार जनतेपासून लपून राहिलेले नाहीत.”
राजकीय श्रेयवादाच्या वादात विकासकामांवर परिणाम होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करत परिसरातील नागरिकांनी हा महत्त्वाचा पूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी मागणी केली आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यास परिसरातील वाहतूक आणि नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

No comments:
Post a Comment