तीन महिन्यांपासून मंद्रुप मंडळ कृषी कार्यालयाला कुलूप; शेतकरी योजनांपासून वंचित
दक्षिण सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मंद्रुप येथील मंडळ कृषी कार्यालय तब्बल तीन महिन्यांपासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अर्ज सादर करणे, अनुदान प्रक्रियेची पूर्तता करणे तसेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत; मात्र कार्यालयाला कुलूप असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सीना-भीमा खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेले हे मंडळ कृषी कार्यालय सध्या अक्षरशः ओस पडल्याचे चित्र आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपयांच्या कृषी योजना राबवल्या जात असताना, प्रत्यक्षात त्यांची माहिती देणारे आणि अंमलबजावणी करणारे कार्यालयच बंद असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मंडळ कृषी अधिकारी किरण सावंत यांच्या नियुक्तीनंतर कार्यालय नियमित सुरू राहत नसल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. अनेक वेळा शेतकरी कार्यालयात येऊनही निराश होऊन परतत आहेत. “आज या, उद्या या” अशा उडवाउडवीच्या उत्तरांमुळे शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे मार्च अखेरीस विविध योजनांच्या अर्ज प्रक्रिया आणि अनुदान कामांची लगबग सुरू असताना कार्यालय बंद असल्याने अनेक गावांतील शेतकरी अडचणीत आले आहेत. एकीकडे पिकांचे नुकसान, विजेच्या समस्या आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या या उदासीनतेमुळे आणखी फटका बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा-संतप्त शेतकऱ्यांनी मंद्रुप मंडळ कृषी कार्यालय तात्काळ नियमित सुरू करावे, जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी आणि रखडलेली कामे त्वरित मार्गी लावावीत, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
‘अतिरिक्त पदभार’ कारणावर प्रश्नचिन्ह- या संदर्भात विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांकडून ‘अतिरिक्त पदभार’ हे कारण पुढे केले जात आहे. मात्र अतिरिक्त पदभाराच्या नावाखाली शेतकऱ्यांची कामे रखडविणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
.png)
No comments:
Post a Comment