अक्कलकोट प्रयोगशाळेच्या तपासणीत ८३० पाणी नमुने दूषित
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, सोलापूर अंतर्गत अक्कलकोट येथील उपविभागीय प्रयोगशाळेने गेल्या सात वर्षांत पाणी तपासणी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. ऑगस्ट २०१८ पासून कार्यरत असलेल्या या प्रयोगशाळेत आतापर्यंत तब्बल ९ हजार ९७५ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ८३० नमुने दूषित असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
जिल्ह्यात यापूर्वी करमाळा, बार्शी, अकलूज, पंढरपूर, सोलापूर आणि सांगोला येथेच प्रयोगशाळा कार्यरत होत्या. वाढत्या गरजांचा विचार करून शासनाने कुर्डुवाडी आणि अक्कलकोट येथे नव्याने प्रयोगशाळा सुरू केली होती. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील पाणी गुणवत्तेच्या तपासणीला अधिक गती मिळाली आहे.
शासनाकडून दरवर्षी किमान २५०० पाणी नमुने तपासणीचे उद्दिष्ट दिले जाते. मात्र स्थानिक गरज आणि परिस्थिती लक्षात घेऊन प्रयोगशाळेकडून उद्दिष्टापेक्षा अधिक नमुन्यांची तपासणी केली जात असल्याने कामाचा विस्तार वाढला आहे.
प्रयोगशाळेत जैविक आणि रासायनिक अशा दोन्ही प्रकारच्या पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतर अशा दोन टप्प्यांत ही प्रक्रिया राबवली जाते. विशेष म्हणजे, जलजीवन मिशन अंतर्गत नव्याने पूर्ण होणाऱ्या पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी नमुना तपासणी अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी पाण्याच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दूषित पाणी नमुन्यांची संख्या चिंतेचा विषय ठरत असून, यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment