"मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?" - शेतकरी आत्महत्या आणि पाणीटंचाईवर नाना पाटेकर भावुक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 20, 2026

"मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?" - शेतकरी आत्महत्या आणि पाणीटंचाईवर नाना पाटेकर भावुक

 "मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?" - शेतकरी आत्महत्या आणि पाणीटंचाईवर नाना पाटेकर भावुक



नागपूर (कटूसत्य वृत्त):- विदर्भातील भीषण पाणीटंचाई, दुर्गम भागातील हालअपेष्टा आणि शेतकऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांमुळे मन हेलावून जात असल्याची भावना व्यक्त करत प्रसिद्ध अभिनेते व 'नाम फाउंडेशन'चे अध्यक्ष नाना पाटेकर भावुक झाले. “हे सगळं थांबवण्यासाठी मी आता महाराष्ट्र सोडून निघून जाऊ का?” असा भावनिक सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी मतभेद विसरून जलसंधारणाच्या चळवळीत एकत्र सहभागी होण्याचे आवाहन केले.

पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त सोमवारी नागपूर येथील रेशीमबागमधील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित जलक्रांती परिषदेत ते बोलत होते.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, महापौर नीता ठाकरे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अॅड. आशिष जयस्वाल आणि खासदार माया इवनाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

केवळ भाषणबाजी नको, कृतीची गरज

यावेळी बोलताना नाना पाटेकर यांनी शहरातील कृत्रिम जीवनशैलीवरही भाष्य केले. “मला शहरात राहणे असह्य होते. तिथल्या सिमेंटच्या भिंती कबरीसारख्या वाटतात,” असे ते म्हणाले. निसर्गाने दिलेल्या मोफत श्वासाचे महत्त्व ओळखून आता गावागावांत फिरत प्रत्यक्ष काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

“आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही. सामाजिक प्रश्न सोडवताना आपण सर्वप्रथम नागरिक आहोत,” असे स्पष्ट करत त्यांनी समाजहितासाठी केवळ भाषण न करता कृती करण्याचे आवाहन केले.

जलसंधारण आणि ग्रामीण विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करत नाना पाटेकर यांच्या भावनिक वक्तव्याने उपस्थितांनाही विचार करायला भाग पाडले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages