नगरसेवक अमोल शिंदे यांच्या सतर्कतेने भंगार चोरीचा प्रकार उघड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महापालिकेच्या मागील गेटजवळील स्टोअर रूम परिसरातून भंगार साहित्य चोरीचा प्रयत्न उघडकीस आला असून, शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अमोल शिंदे यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला. या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह आठ जणांविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या स्टोअर रूममध्ये अतिक्रमण मोहिमेदरम्यान जप्त केलेले साहित्य ठेवण्यात आले होते. हे साहित्य परवानगीशिवाय खासगी वाहनातून बाहेर नेले जात असल्याची माहिती नगरसेवक अमोल शिंदे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित छोटा हत्ती वाहनाची पाहणी केली.
या वेळी स्टोअरमधील भंगार साहित्य खासगी वाहनातून बाहेर नेले जात असल्याचे निदर्शनास आले. प्रकार उघड होताच संबंधित चारजण आणि काही कर्मचारी घटनास्थळावरून पळून गेल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच सभागृह नेते नरेंद्र काळे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकुलवार यांना घटनास्थळी बोलावून घेण्यात आले. यावेळी नगरसेवक सत्यजित वाघमोडे, सात्त्विक बडवे, विनायक विटकर, किरण पवार, उपअभियंता अविनाश वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
या प्रकरणी जमीर हैदर इनामदार, अनोळखी तीन इसम, अधिकारी जगन्नाथ बनसोडे, सचिन गाडे, दीपक कुंभार आणि देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी संगनमत करून परवानगीशिवाय स्टोअर रूममधील साहित्य बाहेर नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
घटनास्थळी सदर बझार पोलिसांचे पथकही दाखल झाले होते. यावेळी नगरसेवक अमोल शिंदे आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी संताप व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.
"महापालिकेच्या स्टोअरमधील भंगार खासगी वाहनातून बाहेर नेले जात होते. आम्ही घटनास्थळी पोहोचताच संबंधित काहीजण आणि कर्मचारी पळून गेले. परवानगी नसताना अशा पद्धतीने महापालिकेचे साहित्य चोरीला जाणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून, संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे," असे नगरसेवक अमोल शिंदे यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment