आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी “दामिनी” व “सचेत” मोबाईल ॲपचा प्रभावी वापर करावा
- अप्पर जिल्हाधिकारी निऱ्हाळी
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यात मान्सून कालावधीत उद्भवू शकणाऱ्या संभाव्य आपत्तींच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी करावी आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तयार करावेत. विविध विभागांचा समन्वय चांगला असावा. तसेच आपत्तीच्या प्रसंगी सर्व यंत्रणांनी “दामिनी” मोबाईल ॲप व “सचेत” मोबाईल ॲपचा प्रभावी वापर करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिले.
मान्सन पूर्व तयारी 2026 च्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्व शासकीय यंत्रणांची अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिशागर ढोले, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता श्रीमती अकुललवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी तर सर्व तहसिलदार व्ही.सी.द्वारे उपस्थित होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री. निऱ्हाळी म्हणाले की, परिवहन विभागाने जेसीबी, पॉकलेन यांसारख्या अर्थमूव्हिंग इक्विपमेंटची माहिती तयार ठेवावी. तसेच तहसिलदारांनी तालुकास्तरावरील सर्व यंत्रणांच्या बैठका घेऊन आपत्तीपूर्व तयारी पूर्ण करावी. संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने सर्व शासकीय विभागांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
ग्रामसुरक्षा यंत्रणा ही एक प्रभावी व युनिक व्यवस्था असून आपत्ती पूर्वसूचना देण्यासाठी तिचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
महावितरण विभागाने २४ तास सुरू राहील असा नियंत्रण कक्ष स्थापन करावा तसेच वादळ व अतिवृष्टीमुळे वीज तारा तुटून वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश श्री. निऱ्हाळी यांनी दिले.
जनावरांच्या चाऱ्याबाबत तहसिलदारांनी आढावा घेऊन टंचाई टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे. आवश्यकतेनुसार चाराबंदी आदेश जारी करण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रत्येक तहसिलदारांकडे आपत्तीच्या काळात थेट समन्वयासाठी गोपनीय फोन उपलब्ध असावा, जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा ठेवावा, नालेसफाईची कामे पूर्ण करावीत तसेच तलाव व विहिरीतील पाण्याची स्वच्छता राखण्याच्या सूचना ही अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिल्या.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संभाव्य आपत्तीच्या दृष्टीने केलेल्या तयारीची माहिती बैठकीत दिली. तसेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सर्व संबंधित यंत्रणांनी आपापल्या विभागाच्या मार्फत आपत्ती काळात करावयाच्या कामकाजाची तसेच आवश्यक साहित्याची माहिती त्यांनी दिली.
0000

No comments:
Post a Comment