महापौर कोंड्याल ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्याबाबत केलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध पर्यावरणपूरक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल, डिझेल व इतर इंधनाचा काटकसरीने आणि गरजेपुरता वापर व्हावा, तसेच वाढते वायू प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलापूर महानगरपालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दर सोमवार हा दिवस ‘नो व्हेईकल डे’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दिवशी खाजगी तसेच शासकीय वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक, सायकल, ई-वाहने किंवा पायी कार्यालयात येण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाला प्रत्यक्ष कृतीतून पाठिंबा देत महापौर विनायक कोंड्याल हे ई-बाईकवरून सोलापूर महानगरपालिकेत दाखल झाले. यावेळी त्यांनी महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी तसेच सोलापूर शहरातील नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
यावेळी महापौर विनायक कोंड्याल म्हणाले की,
“पर्यावरणाचे संरक्षण आणि इंधन बचत ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिलेल्या संदेशानुसार आपण सर्वांनी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे काळाची गरज आहे. ‘नो व्हेईकल डे’ हा उपक्रम फक्त एक दिवसापुरता मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी वातावरण निर्माण करण्याचा संकल्प आहे. सोलापूरकरांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे.”
महापालिकेच्या या निर्णयामुळे इंधन बचत, वाहतूक कोंडी कमी होणे, वायू प्रदूषणावर नियंत्रण आणि नागरिकांमध्ये पर्यावरण जनजागृती निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना या विधायक उपक्रमात सहभागी होऊन देशहितासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment