सोलापुरात शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन तीव्र; प्रशासनाची विनंती धुडकावली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 29, 2026

सोलापुरात शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन तीव्र; प्रशासनाची विनंती धुडकावली

 सोलापुरात शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन तीव्र; प्रशासनाची विनंती धुडकावली


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे जवळपास १३० कोटी रुपयांचे ऊस बिल थकविल्याने सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.

आपल्या हक्काच्या पैशासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशीही तीव्रतेने सुरूच होते.

"शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर उसाची संपूर्ण थकीत रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत एकही शेतकरी मागे हटणार नाही," असा आक्रमक इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे. आंदोलनस्थळी दिवसभर घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, गुरुवार दि. २८ रोजी दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी जवळपास तासभर चर्चा केली. वाढते ऊन आणि आंदोलनातील त्रास लक्षात घेता वयोवृद्ध महिला व पुरुष शेतकऱ्यांना घरी पाठवण्याची विनंती त्यांनी आंदोलकांना केली. मात्र, संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाची ही विनंती एकमुखाने फेटाळून लावत, "मागण्या मान्य होईपर्यंत वयोवृद्धांसह आंदोलन सुरूच ठेवणार," असा निर्धार व्यक्त केला.

या आंदोलनात अमोल पाटील यांच्यासह अरविंद घोडके, अंबादास शिवशंकर, सचिन जवळगे, प्रशांत सुरवसे, गणेश नरे, सचिन सपकाळ यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत.

विविध संघटना व पक्षांचा वाढता पाठिंबा

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला विविध पक्ष व संघटनांचा पाठिंबा वाढत आहे. दि. २७ रोजी संभाजी आरमार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तर दि. २८ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मूलभूत हक्क संघर्ष समिती आणि अखिल भारतीय किसान सभा, सोलापूर यांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा जाहीर केला. तसेच वंचित बहुजन आघाडीनेही तोंडी पाठिंबा दिल्याची माहिती आंदोलक शेतकऱ्यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages