कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप उफाळला; समग्र शिक्षेचे कर्मचारी ५७ दिवसांपासून रस्त्यावर
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- समग्र शिक्षा अंतर्गत गेल्या २५ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या ५७ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ९० कर्मचाऱ्यांसह राज्यभरातील ३,३७८ कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामध्ये कनिष्ठ अभियंता, विषय साधन व्यक्ती, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लेखा सहाय्यक अशा एकूण १३ पदांवरील कर्मचारी सहभागी आहेत.
समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीने धरणे, कामबंद, चक्री उपोषण, अन्नत्याग आणि जेलभरो आंदोलन अशा विविध मार्गांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, अद्याप ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
९ मार्चपासून सुरू असलेल्या या आंदोलनात ‘कायम केल्याशिवाय माघार नाही’ असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. येत्या आठवड्यातही शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला आहे.
२००१ पासून डीपीईपी, त्यानंतर २००४ पासून सर्व शिक्षा अभियान आणि सध्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत हे कर्मचारी कार्यरत आहेत. सुरुवातीला सुमारे १० हजार रुपये मानधनावर काम सुरू झाले, तर सध्या सुमारे ३३ हजार रुपयांपर्यंत मानधन मिळत असले तरी कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्न अद्याप प्रलंबितच आहे.या आंदोलनाला प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट) तसेच अल्पसंख्याक अधिकारी व कर्मचारी संघटनांनीही पाठिंबा दर्शविला आहे.
मोहोळ येथील विषय साधन व्यक्ती लक्ष्मण भोसले आणि माळशिरस येथील प्रकल्प अभियंता अजिज तांबोळी यांनी सांगितले की, “गेल्या २५ वर्षांपासून आम्ही कंत्राटी पद्धतीवर सेवा देत आहोत. किमान आता तरी शासनाने आम्हाला कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे.” शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
.jpeg)
No comments:
Post a Comment