पावसाळ्यापूर्वी मनपाची तयारी; महापौर कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी तुंबण्याच्या समस्या उद्भवू नयेत तसेच नाल्यांमधील पाण्याचा सुरळीत प्रवाह कायम राहावा यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज शहरातील विविध नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. ही पाहणी महापौर विनायक कोंड्याल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अक्कूलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि त्या त्या प्रभागातील नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्यात अक्कलकोट रोडवरील पंजवाणी मार्केट परिसरातील नाला, मुद्रा सनसिटी येथील नाला, घरकुल परिसरातील पोगुल नाला, कारबा नाका, बाळे परिसर तसेच एम.आय.डी.सी. परिसरातील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी नाल्यांची स्वच्छता, पाण्याचा प्रवाह, अतिक्रमणे, गाळ साचलेली ठिकाणे आणि पाण्याचा निचरा सुरळीत होत आहे का याची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.
महापौर विनायक कोंड्याल यांनी पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नाल्यामध्ये मिश्रित होणारे सांडपाणी, दूषित पाणी अथवा अन्य पाण्याचे स्रोत याबाबत सखोल चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले. ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह अडथळ्यांमुळे मंदावलेला दिसून आला, त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
यावेळी महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, “पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, शहरात पाणी साचू नये आणि नाल्यांमधील पाण्याचा निचरा सुरळीत राहावा यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. शहरातील सर्व प्रमुख नाल्यांची नियमित स्वच्छता, पाहणी आणि आवश्यक दुरुस्तीची कामे केली जात आहेत. ज्या ठिकाणी समस्या आढळतील त्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.”
या पाहणी मोहिमेमुळे शहरातील नाला स्वच्छता आणि पावसाळी पूर्वतयारीच्या कामांना अधिक गती मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
.png)
No comments:
Post a Comment