ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 26, 2026

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

 ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ


सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- भारताला प्राचीन हस्तलिखितांचा समृद्ध वारसा लाभलेला असून पारंपारिक ज्ञान पिढ्यान् पिढ्या हस्तलिखितांच्या माध्यमातून जतन होत आले आहे. मात्र ही मौल्यवान हस्तलिखिते विविध ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात असल्याने त्यांचे जतन, संवर्धन व एकत्रित दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने “ज्ञानभारतम्” (Gyan Bharatam) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी केली आहे.
भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पांतर्गत देशव्यापी राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला दिनांक १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश देशातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार करणे हा आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह (National Digital Repository) निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे.
हस्तलिखितांची मालकी संबंधित संस्था, ग्रंथालय अथवा खाजगी संग्राहक यांच्याकडेच कायम राहणार असून, इच्छुकांनी स्वखुशीने हस्तलिखिते शासनाकडे सुपूर्द केल्यास शासन ती स्वीकारणार आहे.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांची महत्त्वपूर्ण भूमिका असून विविध सांस्कृतिक संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, हस्तलिखित संग्रहालये तसेच विद्वान यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यात या प्रकल्पासाठी खालील संस्था क्लस्टर केंद्र व स्वतंत्र केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत :
कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर – क्लस्टर केंद्र, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे – क्लस्टर केंद्र, आनंद आश्रम संस्थान, पुणे – स्वतंत्र केंद्र, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे – स्वतंत्र केंद्र
महाराष्ट्र राज्यासाठी राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य नोडल अधिकारी म्हणून श्री. सुजितकुमार उगले, संचालक, पुराभिलेख संचालनालय कार्य पाहणार आहेत. तसेच श्रीमती अंजली ढमाळ, उपसंचालक, मराठी भाषा विकास संस्था तथा अभिजात मराठी भाषा कक्षा, मराठी भाषा विभाग या सहनोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
सदर सर्वेक्षणासाठी “Gyan Bharatam” हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकन, पडताळणी व दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
या मोहिमेच्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यात ज्ञानभारतम् प्रकल्पासाठी जिल्हा नोडल अधिकारी नियुक्त करणे, जिल्हास्तरीय समिती स्थापन करणे तसेच मंदिरे, मठ, धार्मिक संस्था, विद्यापीठे, ग्रंथालये, शैक्षणिक संस्था व खाजगी संग्राहक यांना सर्वेक्षणात सहभागी करून घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
या सर्वेक्षण मोहिमेत शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, संग्रहालये, संस्कृत पाठशाळा, धार्मिक संस्था, संशोधक, पारंपरिक पंडित, NCC व NSS स्वयंसेवक, विद्यार्थी तसेच वारसा संवर्धन संस्था यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.
आपल्याकडे प्राचीन हस्तलिखिते उपलब्ध असल्यास त्याची माहिती “Gyan Bharatam” मोबाईल अॅपवर अपलोड करून या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी, ज्ञानभारतम प्रकल्प सोलापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages