जिल्हा परिषद वाचनालयाच्या उन्नतीसाठी सभापती सातपुते यांची पाहणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या सभापती संस्कृती सातपुते यांनी जिल्हा परिषदेच्या वाचनालयास सदिच्छा भेट देत तेथील व्यवस्थापन, पुस्तकांची उपलब्धता तसेच वाचकांसाठी उपलब्ध सुविधा यांचा सविस्तर आढावा घेतला.
वाचनालय अधिक सुसज्ज, अद्ययावत आणि सर्वसामान्य वाचकांसाठी उपयुक्त व्हावे, या उद्देशाने विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पाहणीदरम्यान त्यांनी वाचनालयाच्या नूतनीकरणाच्या कामाची माहिती घेत समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
वाचन संस्कृती जपण्यासाठी आणि विद्यार्थ्यांपासून स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासकांपर्यंत सर्वांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वाचनालयाची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“जिल्हा परिषदेचे हे वाचनालय येणाऱ्या काळात सर्व आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त होऊन वाचकांसाठी अधिक समृद्ध आणि प्रेरणादायी ठरेल, असा मला पूर्ण विश्वास आहे,” अशी प्रतिक्रिया सभापती संस्कृती सातपुते यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
.png)
No comments:
Post a Comment