नई जिंदगी परिसरात भंगार गोडाऊनला भीषण आग
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- शहरातील नई जिंदगी परिसरात असलेल्या एका भंगार गोडाऊनला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. अचानक लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले असून गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणातील भंगार साहित्य जळून खाक झाले.
आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग प्रचंड भडकलेली असल्याने ती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली. सुमारे ३० ते ३५ अग्निशमन गाड्यांच्या मदतीने सात तास पाण्याचा मारा करत अथक प्रयत्न करण्यात आले. अखेर दीर्घ प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले.
या आगीत गोडाऊनमधील सर्व भंगार साहित्य जळून खाक झाले असून मालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
प्राथमिक माहितीनुसार, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शॉर्टसर्किटची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेनंतर काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

No comments:
Post a Comment