१२ क्विंटल कांदा विकला; हाती शून्य, उलट खिशातून भरावा लागला एक रुपया! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 9, 2026

१२ क्विंटल कांदा विकला; हाती शून्य, उलट खिशातून भरावा लागला एक रुपया!

 १२ क्विंटल कांदा विकला; हाती शून्य, उलट खिशातून भरावा लागला एक रुपया!




छत्रपती संभाजीनगर (कटूसत्य वृत्त) :- “शेती फायदेशीर करू”, “शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू” अशा घोषणा सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात बळीराजाच्या नशिबी अपमान, तोटा आणि आत्मिक वेदनाच येत असल्याचे विदारक चित्र Paithan कृषी उत्पन्न बाजार समितीत समोर आले आहे. १२ क्विंटल कांदा विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्याच्या हाती एकही रुपया न लागता उलट स्वतःच्या खिशातून एक रुपया भरावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पैठण तालुक्यातील Varudi येथील शेतकरी प्रकाश गलधर यांनी मोठ्या मेहनतीने पिकवलेला १२ क्विंटल कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला होता. उत्पादन खर्च, वाहतूक, मजुरी आणि बाजार समितीच्या खर्चानंतर अंतिम हिशोब करताना त्यांच्या हाती एकही रुपया उरला नाही. उलट बाजार समितीचे शुल्क भागवण्यासाठी त्यांना स्वतःच्या खिशातून एक रुपया भरावा लागला. ही पावती आता राज्यातील ढासळलेल्या कृषी व्यवस्थेचे प्रतीक ठरत आहे.

“रक्ताचं पाणी करून पिकवलेलं पीक कवडीमोल”
कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रचंड खर्च करावा लागतो. बी-बियाणे, खते, औषधे, ठिबक सिंचन, मजुरी आणि वाहतूक यासाठी एकरी तब्बल ७० ते ८० हजार रुपये खर्च होतो. शेतकरी कर्ज काढतो, दागिने गहाण ठेवतो, घरखर्च कमी करतो आणि वर्षभराच्या आशेवर पीक उभं करतो. पण बाजारात भाव कोसळल्यानंतर त्या कष्टाची अक्षरशः राख होत असल्याचे चित्र आहे.

प्रकाश गलधर यांच्या कुटुंबाची परिस्थितीही याला अपवाद नाही. त्यांच्या पत्नीने दिवस-रात्र मेहनत करून कांद्याची लागवड केली. उन्हात, थंडीत आणि पावसात राबून कुटुंबाने हे पीक उभं केलं. घरातील दोन मुलांच्या शिक्षणाची फी, कर्जाचे हप्ते आणि संसाराचा खर्च भागेल या आशेने हा कांदा बाजारात आणण्यात आला होता. मात्र अंतिम पावती हातात पडताच संपूर्ण कुटुंब हादरून गेले.

वरुडी गावात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जाते. गावातील सुमारे २०० ते ३०० शेतकरी कांदा उत्पादनावर अवलंबून आहेत. दरवर्षी जवळपास ३० हजार क्विंटल कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा बाजारातील पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

अनेक शेतकऱ्यांना वाहतूक खर्चही निघत नसल्याने कांदा बाजारात आणणे परवडेनासे झाले आहे. काही ठिकाणी शेतकरी कांदा रस्त्यावर फेकून देत आहेत, तर काही जण जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आल्याचे सांगत आहेत. “उत्पादन खर्च निघत नसेल तर शेती करायची तरी कशासाठी?” असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

एकीकडे सरकार कृषी विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध, बाजारातील दलालांची मनमानी आणि साठवणुकीच्या अपुऱ्या सुविधा यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून केला जात आहे.

कृषी तज्ज्ञांच्या मते, उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारभावात सातत्याने होत असलेली घसरण ही ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी गंभीर धोक्याची घंटा आहे. जर शेतकऱ्यांच्या मालाला किमान हमीभाव आणि बाजार संरक्षण मिळाले नाही, तर पुढील काळात अनेक शेतकरी शेतीपासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

“बळीराजाने जगायचं कसं?” १२ क्विंटल कांदा विकूनही हातात काहीच न उरणे आणि उलट खिशातून पैसे भरावे लागणे ही घटना केवळ आर्थिक नुकसान नाही, तर शेतकऱ्यांच्या स्वाभिमानावर झालेला घाव आहे. मातीत सोनं पिकवणाऱ्या बळीराजाच्या कष्टाची अशी क्रूर चेष्टा होत असेल, तर शेती टिकणार कशी आणि शेतकरी जगणार कसा, हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages