आपच्या वतीने “मोफत बैलगाडी प्रवास” आंदोलन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आप सोलापूर शहरच्या वतीने महागाई, इंधनदरवाढ आणि वाढत्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर शहरात “मोफत बैलगाडी प्रवास” हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.
आपचे सोलापूर शहर अध्यक्ष निलेश संगेपाग यांच्या नेतृत्वात सर्वसामान्य नागरिकांवर वाढत्या इंधनदरांचा आणि महागाईचा होत असलेला परिणाम अधोरेखित करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
आंदोलनादरम्यान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बैलगाडीतून प्रवास करत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. तसेच विविध आशयघन फलक हातात घेऊन सरकारकडे सर्वसामान्यांचा आवाज पोहचवण्याचा प्रयत्न केला .
“देशवासियांवर बैलगाडीची वेळ येण्याआधी सरकार जागं व्हा!”, “12 वर्षे फायदा उद्योगपतींना… मग त्याग फक्त जनतेनेच का करायचा?”, “जनतेच्या खिशाला कात्री, उद्योगपती आणि नेत्यांना सवलती!”, “लोकांना सांगतात ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण!”, “देशहित जपा, ट्रम्पसमोर झुकू नका!”, “जनतेला सल्ले नकोत, दिलासा हवा!” आणि “जनतेला त्यागाची भाषा, सत्ताधाऱ्यांना सुखाची व्यवस्था!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
सरकारकडून नागरिकांना काटकसरीचे सल्ले दिले जात असताना दुसरीकडे वाढती महागाई, इंधनदर आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर यामुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. गेल्या अनेक वर्षांमध्ये मोठ्या उद्योगपतींना विविध सवलती देण्यात आल्या, मात्र सामान्य माणसालाच त्याग करण्यास सांगितले जात असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
देश आधुनिकतेकडे जात असल्याचा दावा केला जात असताना आज सामान्य नागरिकांवर पुन्हा बैलगाडीची वेळ येत असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे. याच संताप आणि वेदनांना वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
यावेळी शहर अध्यक्ष निलेश संगेपाग यांनी आधीच आपल्या सरकारने प्रति्बंधत्मक उपाययोजना करण्यास विलंब केला देशहिताच्या ऐवजी निवडणुकांना प्राधान्य दिले ज्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आता आणखीन विलंब न करता देशहितासाठी मोदीजींनी त्यांची 56 इंच ची छाती ट्रम्प यांना दाखवून द्यावं आणि देशहितासाठी कठोर ठाम भूमिका घ्यावी आजवर अनेक उद्योगपतींना सरकारने दिलासा दिलेला आहे आता फक्त जनतेलाचा त्याग करायला भाग पाडू नका तर उद्योगपतींना आणि नेत्यांना हि त्याग करायला भाग पाडा असे मत व्यक्त केले.
आणि माजी शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे यांनी मोदीजींनी PM केअर फ़ंड आता देशासाठी वापरावे तसेच भाजप पक्षाचे 10 हजार कोटी देखील देशासाठी वापरावे असे मत व्यक्त केले.
हे आंदोलन शहर अध्यक्ष निलेश संगेपाग यांच्या नेतृत्वात झाले तसेच जिल्हाध्यक्ष एम पाटील, माजी शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, मल्लिकार्जुन पिलगेरी, सुचित्रा वाघमारे, रहीम शेख, रॉबर्ट गौडर, बसवराज सारंगमठ, मदणी चाचा, प्रसाद बाबानगरे, व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment