नातेपुते महावितरणच्या मनमानी कारभाराविरुद्ध जन आक्रोश
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- ज्या मातीने आजवर सोन्यासारखी पिके दिली, त्याच मातीत आज पाण्याअभावी उभी पिके करपून जाताना पाहून नातेपुते परिसरातील बळीराजाचे काळीज हेलावले आहे. घामाचे दाम मिळण्याऐवजी महावितरणच्या गलथान कारभारामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने, अखेर नातेपुतेकरांच्या संयमाचा बांध फुटला आसुन समस्त ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांनी एकत्र येत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अक्षय भांड यांच्या नेतृत्वाखाली आपल्या हक्काच्या विजेसाठी नातेपुते महावितरणच्या मनमानी कारभाराविरुद्ध 'जन आक्रोश' पुकारत उपाययोजना करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत
महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांना नातेपुते येथील शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थ यांनी निवेदन दिले आहे.
या देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हणण्यात आले आहे की,भर उन्हात रक्ताचं पाणी करून राबणाऱ्या शेतकऱ्याला रात्रीच्या वेळी अंधारात जीव धोक्यात घालून ओलितासाठी जावे लागते. "आम्हाला रात्रीची वीज नको, तर दिवसा सलग ८ ते १० तास वीज द्या, पश्चिम भागातील शेकडो एकरवरील पिके केवळ विजेच्या लपंडावामुळे जळून खाक होत आहेत. आमची पिके डोळ्यादेखील जळून जाताना पाहण्याचे दुःख सरकारला कळणार का ? जीवघेणा प्रवास आणि अंधारातील भीती नातेपुते शहराच्या गजबजलेल्या टिळक चौक व माऊली मंदिर परिसरात उघड्या वीज तारा घरांना स्पर्श करत आहेत. एखादा मोठा अपघात होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का ? गंजलेले खांब आणि वारंवार उडणारे फ्यूज यामुळे सर्वसामान्य जनता हैराण आहे. त्यात मीटर रीडिंग न घेता येणारी अव्वाच्या सव्वा बिले म्हणजे सामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार हे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. नातेपुते बाजारपेठेचे अर्थकारण विजेवर अवलंबून आहे. जर व्यापाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे हे आर्थिक नुकसान थांबले नाही, तर हा 'जन आक्रोश' महावितरणला महागात पडेल.आता केवळ विनंती नाही, तर हा इशारा आहे!" अशा भावना यावेळी उपस्थित नागरिकांनी निवेदनाद्वारे व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे नातेपुते येथील महावितरणविरोधात मोठे जनमत तयार झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलावी आमचा अंत पाहू नये असा इशारा नातेपुते येथील शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थ यांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अक्षय भांड, शिवसेनेचे अमोल उराडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष देवीदास चांगण, डॉ.नरेंद्र कवितके,किशोर पलंगे, सामाजिक कार्यकर्ते संतोष देवकाते, आरपीआयचे बंटी सोरटे, माजी ग्रा.प. सदस्य गणेश पागे,अॅड.दादा कोळे, संजय उराडे,बाबा बोडरे, शेखर अटक, अक्षय ठोंबरे, अजित पांढरे,धनराज डफळ,प्रथमेश पांढरे, अर्जुन पिसाळ,सोमा भोसले,अमरजित जानकर, जयराज पांढरे, सागर रूपनवर, सागर राऊत,निलेश पोतदार, किशोर दगडे,प्रसाद पांढरे,अभिजीत वाळके , प्रशांत ठोंबरे,गणेश कुचेकर,कमरुद्दीन पालकर, ओम दोशी,रोहित दोशी, नंदू धालपे तसेच व्यापारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment