सिंहगडच्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी, सोलापूर रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे दि. २४ ते २८ एप्रिलदरम्यान पार पडलेल्या साउथ एशियन गोल शॉट बॉल चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने अभूतपूर्व कामगिरी करत चारही गटांमध्ये विजेतेपद पटकावत सर्वांगीण वर्चस्व सिद्ध केले. विशेष म्हणजे या विजयी संघात सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, केगाव, सोलापूर येथील तब्बल ८ विद्यार्थ्यांचा समावेश होता.
स्पर्धेसाठी भारतीय संघ चेन्नई येथून विमानाने श्रीलंकेला रवाना झाला होता. स्पर्धा जिंकून परतताना संघ चेन्नई मार्गे रेल्वेने सोलापूरला दाखल झाला. स्पर्धेतील सब-ज्युनियर बॉईज, सब-ज्युनियर गर्ल्स, यूथ बॉईज आणि यूथ गर्ल्स या सर्व गटांमध्ये भारताने अपराजित कामगिरी करत सुवर्णपदकांची लयलूट केली. प्रत्येक गटात भारताने लीग फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखत शानदार विजय नोंदवले.
सब-ज्युनियर बॉईज गटात भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेवर २३-१८ असा विजय मिळवला, तर सब-ज्युनियर गर्ल्स गटात १९-१६ अशी मात केली. यूथ बॉईज गटात ३६-२७ आणि यूथ गर्ल्स गटात २३-१९ अशा विजयांसह भारताने सर्वच गटांमध्ये सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत सिंहगड संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार प्रदर्शन केले. सब-ज्युनियर गर्ल्स गटात कु. जानवी बुराडे, यूथ गर्ल्स गटात कु. श्रद्धा चव्हाण व कु. आर्या पाटणे, सब-ज्युनियर बॉईज गटात आदित्य गुंड, आशिष बनसोडे व समर्थ मगर, तसेच यूथ बॉईज गटात अथर्व गुर्रम व वरुण सरडा यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत देशाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
सोलापूर रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत
विजय मिळवून सोलापूरमध्ये आगमन होताच सोलापूर रेल्वे स्थानक येथे या विजेत्या खेळाडूंचे उत्स्फूर्त आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. स्वागतावेळी परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी बोलताना संजय नवले यांनी विद्यार्थ्यांचे, प्रशिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन करत सांगितले की, “आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. क्रीडा क्षेत्रात सिंहगडचे विद्यार्थी सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.”
या यशामागे भारतीय संघाचे प्रशिक्षक व क्रीडाशिक्षक राजू ठाकूर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्यांच्या तांत्रिक प्रशिक्षण, शिस्तबद्ध सराव आणि मानसिक तयारीमुळे संघाने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली.
या ऐतिहासिक विजयामुळे सिंहगड पब्लिक स्कूल तसेच सोलापूर जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले असून, विद्यार्थ्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

No comments:
Post a Comment