उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यात वाढत्या तापमानाचा व 'एल निनो'च्या प्रभावाचा विचार करून पशुसंवर्धन विभागाने पशुधनाच्या संरक्षणासाठी व्यापक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यासह उष्णतेचा तीव्र फटका बसणाऱ्या भागांमध्ये विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेमुळे पशुधनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सर्व पशुवैद्यकीय संस्था सतर्क ठेवण्यात आल्या असून, आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, फिरते पथक तातडीच्या सेवेसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. उष्माघात टाळण्यासाठी पशूंना स्वच्छ व थंड पाणी, संतुलित आहार आणि सावलीची व्यवस्था करणे अत्यावश्यक असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
शेतातील कामासाठी वापरल्या जाणाऱ्या जनावरांना सकाळी ११ ते दुपारी ४ या तीव्र उन्हाच्या काळात विश्रांती देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, गोठ्यांवर गवताचे आच्छादन, पाण्याचा शिडकावा तसेच पंखे किंवा स्प्रिंकलरचा वापर करून तापमान नियंत्रित ठेवण्याच्या सूचना आहेत. उष्णतेची लक्षणे दिसल्यास त्वरित जनावरांना थंड ठिकाणी हलवून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था व सामाजिक संघटनांनी रस्त्यावरील जनावरांसाठी सार्वजनिक ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना देण्यात आली आहे. पशुपालकांनी या सूचनांचे पालन करून पशुधनाचे आरोग्य जपावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. उष्ण लहरींच्या काळात काय करावे? पशूंना सतत स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध ठेवावे. सावलीत निवारा व वायुवीजनाची व्यवस्था करावी. संतुलित आहार द्यावा. उष्णतेच्या वेळेत काम टाळावे.
गोठ्यात पाणी शिंपडून तापमान कमी ठेवावे. उष्ण लहरींच्या काळात काय करू नये? उन्हात दीर्घकाळ जनावरे उभी ठेवू नयेत. बंद वाहनात पशुधन ठेवू नये. तीव्र उन्हात वाहतूक टाळावी. पाण्याची कमतरता होऊ देऊ नये. 'एल निनो'च्या संकट काळात पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
चारा व्यवस्थापन व पशुधनाच्या आरोग्याबाबत कोणत्याही मदतीसाठी स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. तसेच १९६२ कॉल सेंटरच्या माध्यमातून पशुसंवर्धनविषयक सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. - डॉ. अनिल तांबे, उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धविकास, सोलापूर

No comments:
Post a Comment