भंगारातून कोट्यवधींची कमाई : मध्य रेल्वेचा ४५९.५२ कोटींचा विक्रम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भंगार विक्रीतून तब्बल ४५९.५२ कोटी रुपयांचा महसूल मिळवत गेल्या दोन वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. “झिरो स्क्रॅप स्टेटस” साध्य करण्याच्या उद्दिष्टाने राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे ही उल्लेखनीय यशस्वी कामगिरी साध्य झाली आहे.
३१ मार्च २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाने निश्चित केलेले ४५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ओलांडत ही भरघोस कमाई केली. भंगाराचे महसूल उत्पन्न करणाऱ्या मालमत्तेत रूपांतर आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट ठरले.
या यशामागे विविध प्रकारच्या भंगार आणि टाकाऊ साहित्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट महत्त्वाची ठरली. यात ४७,५०२ मेट्रिक टन रेल्वे रूळ भंगार, ३१,२९८ मेट्रिक टन लोह-धातू, ३,६१६ मेट्रिक टन लोह व्यतिरिक्त धातू, २,६५,६२५ स्लीपर्स तसेच ५० लोकोमोटिव्ह, ७८ डबे आणि १३७ वॅगन्स यांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेच्या विविध विभागांनी यामध्ये मोठा वाटा उचलला. भुसावळ विभागाने १०५.३९ कोटी रुपयांची विक्रमी कमाई करत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर माटुंगा कार्यशाळा (६८.३९ कोटी), नागपूर विभाग (६४.०२ कोटी), मुंबई विभाग (५५.४९ कोटी) आणि पुणे विभाग (५० कोटी) यांचा समावेश आहे.
याशिवाय, वापरात नसलेले पण कार्यरत असलेले संसाधन वाया जाऊ न देता त्यांचा पुनर्वापर करण्यावरही भर देण्यात आला. याचाच भाग म्हणून एक रोटाटेक प्रिंटिंग मशीन भंगारात टाकण्याऐवजी ८.७५ कोटी रुपयांच्या मूल्याने नाशिक प्रिंटिंग प्रेसकडे हस्तांतरित करण्यात आले.
या संपूर्ण कामगिरीतून मध्य रेल्वेची आर्थिक शिस्त, कार्यक्षम व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक दृष्टीकोन अधोरेखित होत असून ‘झिरो स्क्रॅप मिशन’च्या दिशेने ठाम पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
.png)
No comments:
Post a Comment