श्रीमती भारती गवळी यांचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील उंबरे दहिगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विषय शिक्षिका श्रीमती भारती गवळी यांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आणि विद्यार्थी पटनोंदणी वाढीसाठी केलेल्या कामाबद्दल माळशिरस पंचायत समितीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते नुकतेच प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
माळशिरस तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने नुकतेच तालुक्यातील 39 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती दत्ता मगर, उपसभापती मनीषा पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती गवळी यांची शैक्षणिक क्षेत्रातील सेवा जवळपास 28 वर्षे इतकी झाली आहे. शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात त्यांनी सक्रीय सहभाग घेऊन उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये 100 टक्के पटनोंदणी, गुणवत्तावाठीसाठी विविध उपक्रम, अध्यापनात डिजीटल तंत्राचा उपयोग, विद्यार्थ्यांसाठी नवनिर्मिती प्रोत्साहनपर उपक्रम, माता- पालकांचा शालेय उपक्रमात सहभाग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोकवर्गणीतून शाळेचा विकास, विविध प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन, मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न अशा सामाजिक कामांमध्येही हिरीरीने त्यांनी पुढाकार घेतला आहे.
नुकत्याच, शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक- अधिकारी-कर्मचारी स्पर्धेत श्रीमती भारती गवळी यांनी तालुका आणि विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरावर सहभाग नोंदवला होता.
श्रीमती भारती गवळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी यांनी तसेच उंबरे दहिगाव ग्रामस्थ, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि सहशिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.
.png)
No comments:
Post a Comment