मनोहर भोसलेच्या भोंदूगिरीचा फुगा फुटला; घोटी येथील आश्रम बंदीचा निर्णय ठरला! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 27, 2026

मनोहर भोसलेच्या भोंदूगिरीचा फुगा फुटला; घोटी येथील आश्रम बंदीचा निर्णय ठरला!

 मनोहर भोसलेच्या भोंदूगिरीचा फुगा फुटला; घोटी येथील आश्रम बंदीचा निर्णय ठरला!




करमाळा (कटूसत्य वृत्त):- जादूटोणा आणि फसवणुकीच्या गंभीर आरोपांमुळे अटकेत असलेल्या मन्यामामा उर्फ मनोहर भोसले याच्या करमाळा तालुक्यातील घोटी येथील आलिशान आश्रमावर आता स्थानिक प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

घोटी ग्रामपंचायतीचे सरपंच विलासराव राऊत यांनी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना लेखी पत्र देत हा आश्रम कायमस्वरूपी बंद करण्याची आणि त्याची सखोल चौकशी करण्याची ठोस मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांत मनोहर भोसलेवर फसवणूक आणि इतर गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांत ग्रामपंचायतीने घेतलेली ही आक्रमक भूमिका लक्षवेधी ठरली आहे.

गावपातळीवरूनच उभा राहिलेला हा विरोध आता पोलीस प्रशासनावर निर्णायक कारवाईचा दबाव निर्माण करत आहे. सरपंचांनी दिलेल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे मनोहर भोसले गेल्या पाच वर्षांपासून घोटी येथे सुमारे २७ एकरांवर पसरलेल्या आश्रमातून तथाकथित धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रम राबवत होता. विशेषतः अमावस्या आणि पौर्णिमेला मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी होत असून त्या वेळी भविष्य सांगणे, जादूटोणा करणे यांसारख्या प्रकारांद्वारे लोकांची दिशाभूल केली जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

या आश्रमात केवळ स्थानिक नव्हे तर परराज्यातील लोक देखील वास्तव्यास असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गावातील नागरिक मात्र या आश्रमापासून दूर राहतात तसेच भोसलेशी कोणताही संबंध ठेवत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

याचबरोबर राजकीय क्षेत्रातील काही नेते, तसेच विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटी व्यक्ती या आश्रमात येत असल्याची चर्चा पत्रात नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले असून आश्रमाच्या माध्यमातून नेमके कोणते व्यवहार चालत होते याची चौकशी करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

मनोहर भोसले विरोधात सध्या फसवणुकीचा गुन्हा दाखल असून यापूर्वीही त्याच्यावर महिलेशी संबंधित गंभीर अत्याचाराचा गुन्हा करमाळा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. त्यामुळे हा केवळ अंधश्रद्धेचा मुद्दा नसून गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांशी संबंधित असल्याचे स्पष्ट होत आहे. मनोहर भोसलेचा भूतकाळही तितकाच वादग्रस्त राहिला आहे.

इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावचा रहिवासी असलेला भोसले शिक्षणात अपयश आल्यावर आठवडी बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता. त्यानंतर काही वर्षांतच त्याने स्वतःला संत बाळूमामांचा आशीर्वाद लाभल्याचा दावा करत धार्मिक वेश परिधान केला आणि उंदरगाव परिसरात पहिला मठ उभारला.

स्वतः संत बाळूमामा अवतरतात या दाव्यामुळे अमावस्या-पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होऊ लागली आणि त्यातूनच त्याचा प्रभाव झपाट्याने वाढला. अनेक राजकीय नेत्यांसोबतचे त्याचे फोटो समोर आले असून त्याच्या सल्ल्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांचीही वर्दळ असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे यापूर्वी करमाळा-इंदापूर सीमेवरील उंदरगाव येथील भोसलेचा आश्रम गुन्हा दाखल झाल्यानंतर बंद करण्यात आला होता. त्या वेळीही स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आता त्याच पद्धतीने घोटी येथील आश्रमावरही कारवाई होणार का याकडे संपूर्ण करमाळा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

ग्रामपंचायतीच्या या ठोस भूमिकेमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अंधश्रद्धा, फसवणूक आणि संभाव्य गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते आणि घोटीतील हा आलिशान आश्रम खरंच कायमचा बंद होतो का याचा निर्णय आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages