एकाच रात्रीत ३ ऑर्केस्ट्रा बारवर छापे;
सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त, ९१ जणांवर गुन्हे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी (१७ एप्रिल) पहाटे सोलापूर तालुका आणि बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तीन नामांकित ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई केली. या छाप्यात अश्लील नृत्य आणि वेळेची मर्यादा ओलांडणाऱ्या बार मालकांसह एकूण ९१ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, १ कोटी २१ लाख ८३ हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महिलांकडून अश्लील हावभाव व नृत्य
ऑर्केस्ट्रा बारचा परवाना घेऊन दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ बार सुरू ठेवणे, महिलांकडून अश्लील हावभाव व नृत्य करून घेणे आणि पैशांची उधळण होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. हे कृत्य 'महाराष्ट्र अश्लील नृत्यांवर प्रतिबंध व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियमा'न्वये गुन्हा असल्याने ही विशेष मोहीम राबवण्यात आली.
छापा टाकलेले ३ बार आणि कारवाईचा तपशील
१) कॅसिनो ऑर्केस्ट्रा बार (कोंडी, ता. उत्तर सोलापूर):
सपोनि अनिल सनगल्ले आणि पथकाने केलेल्या कारवाईत ११ पीडित महिला अश्लील नृत्य करताना आढळल्या. बार मालक प्रभाकर काळे आणि मॅनेजरच्या सांगण्यावरून हे प्रकार सुरू होते. पोलिसांनी येथे २३ ग्राहकांना ताब्यात घेतले असून लॅपटॉप, साउंड सिस्टम आणि वाहनांसह ४६,३१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
२) सुखसागर ऑर्केस्ट्रा बार (खेड, ता. उत्तर सोलापूर):
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आणि पथकाने येथे छापा टाकला. मालक मिथुन राठोड आणि मॅनेजरच्या संमतीने ७ महिलांकडून अश्लील नृत्य करून घेतले जात होते. १८ ग्राहकांवर कारवाई करत पोलिसांनी १८,००,९८० रुपयांचा मुद्देमाल आणि ९ वाहने जप्त केली.
३) सेन्ट्रो ऑर्केस्ट्रा बार (बळेवाडी, ता. बार्शी):
सपोनि कारंडे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत १८ महिला अश्लील हावभाव करताना आढळल्या. येथे ९ ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे, या ठिकाणी ५७,५१,२५५ रुपयांच्या मुद्देमालासह १ तलवारही मिळून आली आहे. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त
या तिन्ही कारवायांमध्ये मिळून एकूण १,२१,८३,२३५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये साउंड सिस्टम, महागडे मोबाईल, रोख रक्कम आणि अनेक वाहनांचा समावेश आहे.
यांनी बजावली कामगिरी
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल नवले, अनिल सनगल्ले, देवीदास कारंडे, दशरथ गोरे, गणेश पाटील, श्रीदेवी परचंडे आणि आरसीपी (RCP) पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

No comments:
Post a Comment