आंबेडकर जयंती मिरवणुकीत नियमभंग; लाखोंच्या डॉल्बी जप्त, मंडळावर गुन्हा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सांगता मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत मोठ्या आवाजात डॉल्बी वाजवणाऱ्या मंडळावर फौजदार चावडी पोलिसांनी कडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल 20 लाख 70 हजार रुपये किमतीचे डॉल्बी साहित्य आणि वाहन जप्त करण्यात आले असून संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह डॉल्बी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 19 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या आंबेडकर जयंती सांगता मिरवणुकीपूर्वीच पोलिसांकडून सर्व मंडळांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. डॉल्बी सिस्टीमचा वापर न करण्याचे तसेच कर्कश आवाजात गाणी न वाजवण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी 15 एप्रिल रोजीच जारी केले होते. मिरवणुकीस दुपारी 12 वाजल्यापासूनच परवानगी देण्यात आली होती.
तथापि, 19 एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास सरस्वती चौक परिसरात आम्रपाली बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या मंडळाने परवानगी नसताना डॉल्बी लावून हिंदी व मराठी गाणी मोठ्या आवाजात वाजवली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन संबंधितांना सूचना दिल्या; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून गोंगाट सुरूच ठेवण्यात आला.
या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी कपिल सुरवसे, आकाश वामणे, साजन गायकवाड, आदित्य सोनकांबळे, बाबू घागरे, अविनाश गायकवाड (सर्व रा. सोलापूर) तसेच डॉल्बी सिस्टीम चालक/मालक प्रेम पवार (रा. पिंपरी-चिंचवड, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत नोंदवण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी 4 बेस, 4 टॉप, 1 बूस्टर, 2 अॅम्प्लिफायर, 1 पॉवर ट्रॉली आणि अशोक लेलँड ‘दोस्त’ (MH14 MH 9684) हे वाहन असा एकूण 20.70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अशा प्रकारच्या नियमभंगावर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

No comments:
Post a Comment