पक्ष बळकटीकरणाला सर्वोच्च प्राधान्य :- डॉ. श्रीकांत शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 17, 2026

पक्ष बळकटीकरणाला सर्वोच्च प्राधान्य :- डॉ. श्रीकांत शिंदे

 पक्ष बळकटीकरणाला सर्वोच्च प्राधान्य :- डॉ. श्रीकांत शिंदे




सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- राज्यात पुढील तीन वर्षांत निवडणुका होणार नसल्याने या कालावधीत पक्ष विस्तार आणि संघटना बळकटीकरणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिले.

सोमवारी गांधीनगर येथील हेरिटेज मंगल कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. शिंदे यांनी सोलापूर, माढा आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार डॉ. ज्योती वाघमारे, चंद्रहार पाटील, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, भगीरथ भालके, अनिल सावंत यांची उपस्थिती होती.

शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर संपर्कप्रमुखांना फिल्डवर उतरवण्यात आले असून, लोकसभा व जिल्हानिहाय बैठका घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर व पुणे येथील आढाव्यानंतर आता सोलापूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्येही संघटनात्मक स्थितीचा आढावा घेतला जात आहे.




पुढील टप्प्यात जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण तसेच महापालिका वॉर्डनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. या माध्यमातून पक्षाची ताकद तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे.

शिवसेनेची ताकद गावागावात वाढली पाहिजे, शाखा विस्तार झाला पाहिजे आणि प्रत्येक पदाधिकारी सक्रिय आहे का, याची सखोल पडताळणी केली जाईल, असे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच, लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमधील यशानंतर आगामी जिल्हा परिषद निवडणुकांतही पक्ष पूर्ण ताकदीने उतरवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संपर्कप्रमुखांच्या दौऱ्याचा सविस्तर अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात येणार असून, या माध्यमातून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार शिवसेना नेतृत्वाने व्यक्त केला आहे. आगामी काळात तळागाळातील कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages