लोकमंगल महाविद्यालयात शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा(ए. आय) वापर याविषयी व्याख्यान संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीसंलग्नित महाविद्यालयात " शेती व कृत्रिम बुद्धिमत्ता वापर" याविषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी मार्गदर्शक म्हणून नेहा राचल ह्या लाभल्या होत्या. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शाश्वत शेती म्हणजे काय व त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा फायदेशीर आहे याविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर केल्याने संसाधनांची बचत, पर्यावरणाचे रक्षण आणि उत्पादनात वाढ होते. याद्वारे अचूक शेतीमध्ये सॅटेलाईट इमेज आणि ड्रोनच्या मदतीने शेतातील मातीचा दर्जा, ओलावा आणि पिकांची वाढ तपासली जाते. यामुळे संपूर्ण शेतात खते किंवा पाणी न वापरता जिथे गरज आहे तिथेच वापर करणे शक्य होते. एआय सेन्सर्स जमिनीतील ओलावा आणि हवामानाचा अंदाज घेऊन पिकांना नक्की कधी आणि किती पाण्याची गरज आहे हे ठरवतात. यामुळे २५% पर्यंत पाण्याची बचत होऊ शकते. पिकांवरील रोगांची सुरुवातीच्या काळातच ओळख पटवण्यासाठी एआय आधारित इमेज प्रोसेसिंगचा वापर महत्वपूर्ण ठरतोय. यामुळे कीटकनाशकांचा अनावश्यक वापर कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. जमिनीतील पोषक तत्वांच्या कमतरतेचे विश्लेषण करून नेमकी कोणती खते किती प्रमाणात वापरावीत, याचे अचूक मार्गदर्शन शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञानामुळे मिळणे शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांनी शेती व ए आय संबंधित विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करून आपल्या शंकाचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमाचे समन्वयन प्रा वर्षा मानेदेशमुख यांनी केले. या कार्यक्रमास लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अमोल शिंदे,लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सचिन फुगे, लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन , महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment