देशाच्या विकासासाठी जनगणनेत नागरिकांनी जबाबदारीने सहभाग नोंदवावा
- मुख्याधिकारी सुरेश भदर
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- देशाच्या विकासासाठी व भविष्यातील नियोजना साठी जनगणनेतील माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते. पायाभूत सुविधा, विविध योजना व विकास कामांसाठी ही माहिती आधारभूत असल्याने नागरिकांनी जबाबदारीने सहभाग नोंदवावा असे अवाहन सुरेश भदर,मुख्याधिकारी,अनगर नगरपंचायत यांनी केले आहे .
आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारीला वेग आला असून, सुरेश भदर,मुख्याधिकारी,अनगर नगरपंचायत यांच्या उपस्थितीत अनगर येथील बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय,अनगर येथे दि. २७, २८ व २९ एप्रिल दरम्यान प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. या अंतर्गत प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. या प्रसंगी मुख्याधिकारी सुरेश भदर माध्यमांशी बोलत होते.त्यांनी पुढे सांगितले की, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जनगणनेची प्राथमिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनगर शहरातील जनगणना कामी एकूण २६ प्रगणक, ०४ पर्यवेक्षक व ४ राखीव कर्मचारी अशा एकूण ३४ जणांची टीम तयार करण्यात आली आहे.
या प्रशिक्षण शिबिरास राजेंद्र गुंड ,अतिरिक्त चार्ज अधिकारी तसेच प्रशिक्षण अधिकारी महेश गोडगे,महादेव माने,पंडीत भोरे ,अंजली भूरूक,रोहित कानोडे,संयोगिता गौंडरे,मोहसीन मुलाणी,पांडुरंग नामदास आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
चौकट ........
' जनगणना कामी प्रशासनाला सहकार्य करावे '.
प्रशिक्षण २७ ते २९ एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. या माध्यमातून सर्व ३४ कर्मचाऱ्यांना जनगणनेचे सविस्तर प्रशिक्षण दिले जाईल. तर नागरिकांनी १ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकां मार्फत स्वगणनेचा टप्पा पार पडेल. त्यानंतर १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक घरोघरी भेट देऊन घरांची व इमारतींची नोंदणी करतील. या काळात नागरिकांनी अचूक व संपूर्ण माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे.
--- सुरेश भदर, चार्ज अधिकारी तथा मुख्याधिकारी,अनगर नगरपंचायत

No comments:
Post a Comment