खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत आमदार कल्याणशेट्टी यांची सूचना
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून खरीप हंगाम यशस्वी करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत बियाणे व खतांचा तुटवडा होऊ देऊ नये, यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, अशा स्पष्ट सूचना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिल्या.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत अक्कलकोट येथे तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक पार पडली. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे व खतांची वेळेवर उपलब्धता, कृषी सेवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खतांचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी संबंधित विभागांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पीक पद्धतीत बदल, पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि कीड-रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. योग्य वेळी मार्गदर्शन, तंत्रज्ञान आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास उत्पादनात निश्चित वाढ होईल. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे, असेही आमदार कल्याणशेट्टी यांनी नमूद केले.
या बैठकीस पंचायत समिती सभापती रश्मी हिप्परगी, उपसभापती सागर कल्याणशेट्टी, बाजार समिती उपसभापती अप्पासाहेब पाटील, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, खत व औषध विक्रेते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत शेतकरी हा केंद्रबिंदू मानून सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करत खरीप हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शेतकऱ्यांच्या अडचणी तत्काळ सोडवून त्यांना सक्षम करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

No comments:
Post a Comment