'गँन्ट्री स्ट्रक्चर'वर चढून उग्र आंदोलन व सामूहिक आत्मदहनाचा इशारा- अक्षय भांड
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते परिसरातील वीज प्रश्न आता गंभीर झाला असून, प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे तरुणांमध्ये मोठा संताप आहे. जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही आणि वीज पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही," अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अक्षय भांड यांनी दिली असुन येणाऱ्या ५ मे रोजी सब-स्टेशनच्या गँन्ट्री स्ट्रक्चरवर चढून उग्र आंदोलन व सामूहिक आत्मदहनाचा इशारा महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना यांना लेखी निवेदन द्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अक्षय भांड व तरुणांने दिला आहे.
सदर देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे म्हणण्यात आले आहे की,नातेपुते शहर आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणच्या अत्यंत बेजबाबदार आणि निष्क्रिय कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि व्यापारी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. वारंवार खंडित होणारी वीज आणि कमी दाबाने होणारा वीज पुरवठा यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या अन्यायाविरोधात आता नातेपुते विभागातील सर्व तरुण आणि नागरिक एकवटले असून, प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी येत्या ५ मे रोजी सब-स्टेशनच्या 'गँन्ट्री स्ट्रक्चर'वर चढून उग्र आंदोलन व सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नातेपुते विभागातील वीज समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. शेतीला वेळेवर वीज मिळत नाही, तर कमी दाबाच्या विजेमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित लाईनमन आणि इंजिनिअर्स याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी तरुणांनी केला आहे. म्हणून येत्या मंगळवारी, ५ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता सर्व तरुण एकत्र येऊन सब-स्टेशनवर हे टोकाचे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनादरम्यान जर कोणाच्या जीवितास धोका निर्माण झाला किंवा जीवितहानी झाली, तर त्याला सर्वस्वी महावितरण प्रशासन आणि स्थानिक शासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आसुन या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा (वहिनी) पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाला माहितीसाठी पाठवण्यात आली असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अक्षय भांड,संदिप चांगण, शेखर राऊत, सागर देवडे वृषभ वाडेकर, सनी गवळी, प्रथमेश पांढरे, बाबा काळे, सुनिल ढोबळे, जनार्दन पवार, प्रशांत ठोंबरे, धनराज डफळ, शुभम सोरटे, अर्जून पिसाळ, तुषार जठार, अजित पांढरे, सत्यजीत सावंत, संग्राम साळवे, अक्षय ठोंबरे या तरुणांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना देण्यात आलेल्या निवेदनावर सह्या केल्या आहेत.

No comments:
Post a Comment