सोलापूर जिल्हा बँकेची पीककर्ज वाटपात आघाडी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 30, 2026

सोलापूर जिल्हा बँकेची पीककर्ज वाटपात आघाडी

 सोलापूर जिल्हा बँकेची पीककर्ज वाटपात आघाडी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्याची आर्थिक वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीक कर्जवाटपात सातत्याने प्रगती केली आहे. प्रशासकांच्या कार्यकाळात बँकेच्या कर्जवाटपाचा आकडा वाढला असून, अन्य बँकांच्या तुलनेत जिल्हा बँकेने पीककर्ज वाटपात आघाडी घेतली आहे.

त्यामुळे बँक आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्हा बँकेची सर्वांत मोठी ताकद म्हणजे ग्रामीण भागात पसरलेले शाखांचे जाळे, याच ताकदीच्या जोरावर बँकेने शेती क्षेत्राला मोठे आर्थिक पाठबळ दिले आहे. जिथे अनेक राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँका केवळ मोठ्या व सधन शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यास प्राधान्य देतात, तिथे जिल्हा बँक आजही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी हक्काचा पतपुरवठादार ठरली आहे. गेल्या पाच वर्षांत बँकेने दिलेले उद्दिष्ट ओलांडून अधिक कर्जपुरवठा करण्याची कामगिरी सातत्याने केली आहे.

खरीप हंगामातही बँकेचा सिंहाचा वाटा एकेकाळी रब्बी हंगामासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात आता खरीप पिकांचे क्षेत्रही लक्षणीयरीत्या वाढले आहे. या बदलाचा स्वीकार करत जिल्हा बँकेने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात बँकेला १४०२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, त्यापैकी १३७० कोटी रुपयांचे विक्रमी वाटप करण्यात आले आहे. आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीच्या पतपुरवठा आराखड्यात जिल्हा बँकेला नेमके किती कोटींचे उद्दिष्ट मिळते आणि बँक ते कसे पूर्ण करते, याकडे आता जिल्ह्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

गेल्या सात वर्षांतील पीक कर्ज वाटपाचा आढावा

आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये बँकेने ३६,६४६ शेतकऱ्यांना ३२१ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले होते, तर त्यावेळी येणे बाकी ११७२ कोटी रुपये होती. त्यानंतर २०२०-२१ मध्ये ४०१ कोटी रुपयांचे कर्जवाटप ४१,९०९ शेतकऱ्यांना करण्यात आले (येणे बाकी १२६७ कोटी), तर २०२१-२२ या वर्षात हे प्रमाण वाढून ७३१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आणि लाभार्थ्यांची संख्या ६४,५०७ इतकी होती (येणे बाकी १४२३ कोटी). २०२२-२३ या वर्षात बँकेने मोठी झेप घेत ८५,२५३ शेतकऱ्यांना ११२६ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले (येणे बाकी १७३७ कोटी). २०२३-२४ या काळात ८१,६८० शेतकऱ्यांना ११६६ कोटी रुपयांचे वाटप झाले असून येणे बाकी १८८९ कोटी रुपये नोंदवली गेली.

त्यानंतर २०२४-२५ मध्ये ८७,८६३ शेतकऱ्यांना १३०९ कोटी रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले (येणे बाकी २०८८ कोटी) आणि २०२५-२६ या ताज्या आर्थिक वर्षात बँकेने ९१,२६८ शेतकऱ्यांना १३७० कोटी रुपयांचे सर्वाधिक कर्जवाटप केले असून, बँकेची एकूण येणे बाकी २२१४ कोटी रुपये इतकी राहिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages